पोंभुर्ले : ‘आजच्या वेगवान आणि बदलत्या माध्यम क्षेत्रातही पत्रकारिता आपले अस्तित्व टिकवून आहे, याचे श्रेय आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांनी घालून दिलेल्या ध्येयधोरणांना जाते. बाळशास्त्रींनी संपूर्ण महाराष्ट्राला आणि देशाला दिशा दिली आहे. महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीच्या वतीने दिला जाणारा दर्पण पुरस्कार हा बाळशास्त्रींच्या नावाने दिला जातो, म्हणूनच तो पत्रकारितेतील सर्वोच्च सन्मान आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी केले. दरम्यान, साताऱ्यातील ज्येष्ठ पत्रकार जीवनधर चव्हाण यांना यावेळी दर्पण पुरस्काराने गौरवण्यात आले.
पोंभुर्ले (ता. देवगड) येथे आयोजित राज्यस्तरीय पत्रकार दिन व दर्पण पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे अध्यक्ष रवींद्र बेडकिहाळ, माजी आमदार प्रमोद जठार, मुंबई दूरदर्शनचे माजी सहाय्यक केंद्र संचालक जयु भाटकर, सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, पोलिस अधीक्षक मोहन दहिकर, पत्रकार कल्याण निधीचे उपाध्यक्ष कृष्णा शेवडीकर, सरपंच प्रियांका धावडे व सुधाकर जांभेकर उपस्थित होते.
रवींद्र बेडकिहाळ म्हणाले, पोंभुर्ले हे गाव महाराष्ट्रातील पत्रकारांची पंढरी व्हावी, या भावनेतून हे स्मारक उभारले आहे. आम्ही श्रद्धेने जांभेकरांच्या कार्याचा जागर करत आहोत. बाळशास्त्रींची विद्वत्ता, पत्रकारिता आणि संशोधन क्षेत्रातील त्यांचे महान कार्य आजही मार्गदर्शक आहे.
यावेळी सन 2025 च्या राज्यस्तरीय ‘दर्पण’ पुरस्कारांचे वितरण ना. प्रा. राम शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाले. यामध्ये पुण्याचे ज्येष्ठ पत्रकार राजीव साबडे, नांदेडचे शंतनु डोईफोडे, मसूर (जि.सातारा) येथील बसवेश्वर चेणगे, श्रीरामपूरचे प्रकाश कुलथे, अहिल्यानगरचे श्रीराम जोशी, यवतमाळचे अनिल काळबांडे, कोल्हापूरचे आशिष कदम व पुण्याचे जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील यांचा समावेश आहे. तर सिंधुदुर्गमधील विजय पालकर यांचा पुरस्कार त्यांच्या पत्नी सौ. श्वेता पालकर यांनी स्वीकारला.
सूत्रसंचलन विश्वस्त अमर शेंडे यांनी केले. या सोहळ्यास जिल्ह्यातील व राज्यभरातील पत्रकार व विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
स्मारक प्रकल्पासाठी स्वनिधीतून मदत करणार..
‘दृष्टीकोन आणि पारदर्शकता असेल तर अशक्य काहीच नाही. बाळशास्त्रींच्या या पवित्र भूमीतील स्मारकासाठी मी माझ्या स्थानिक विकास निधीतून निश्चितपणे निधी उपलब्ध करून देईन,“ अशी ग्वाही त्यांनी दिली. तसेच ग्रामपंचायत व पत्रकार कल्याण निधीने यासंदर्भात तातडीने पाठपुरावा करावा, असेही ना. प्रा. राम शिंदे यांनी नमूद केले.