सातारा : ऑलिम्पिकवीर सातार्याचे पैलवान श्रीरंग आप्पा जाधव यांचे कुस्ती क्षेत्रातील कार्य हे अतुलनीय आहे. आजच्या पिढीला त्यांचे हे राष्ट्रीय स्तरावरील योगदान जिल्हा क्रीडा संकुलातील तैलचित्रामुळे प्रेरणादायी राहील, असे प्रतिपादन राष्ट्रीय कुस्तीपटू पैलवान बजरंग कदम यांनी केले.
जिल्हा क्रीडा अधिकारी नितीन तारळकर यांच्या सहकार्याने ऑलिम्पिकवीर पै. श्रीरंग जाधव यांच्या जन्मशताब्दीपूर्तीनिमित्त जिल्हा क्रीडा संकुलात तैलचित्राचे अनावरण दिवंगत पैलवान श्रीरंग जाधव यांच्या पत्नी सुभद्रा जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाच्या प्रसंगी बजरंग कदम यांनी आपल्या भावना प्रकट केल्या.
पै. बजरंग कदम पुढे म्हणाले, सातारा तालीम संघाचे संस्थापक असणारे श्रीरंग आप्पा जाधव यांनी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघटनेचे कार्याध्यक्ष म्हणून सातारा जिल्ह्यातच नव्हे तर राष्ट्रीय पातळीवर आपल्या कुस्तीचा वेगळा ठसा उमटवला. राष्ट्रीय क्रीडा प्रबोधिनीचे सक्रिय सदस्य असणार्या श्रीरंग आप्पा यांनी हेलसिंकी ऑलिम्पिक मध्ये भारताचे प्रतिनिधीत्व केले. त्यांचे हे जागतिक स्तरावरचे कुस्ती क्षेत्रातील योगदान आजच्या पिढीला निश्चित प्रेरणादायी ठरणार आहे. ही प्रेरणा ही श्रीरंग आप्पांच्या तैलचित्राच्या माध्यमातून मिळणार आहे. तसेच पैलवान श्रीरंग आप्पा जाधव यांच्या स्मृती सातारा जिल्ह्याच्या क्रीडा परंपरेत कायम राहाव्यात यासाठी राज्य शासनाकडे विशेष पाठपुरावा करणार असल्याची भावना श्रीरंग आप्पा जाधव यांचे चिरंजीव वनराज जाधव यांनी यावेळी व्यक्त केली.
या कार्यक्रमासाठी पै. श्रीरंग जाधव यांच्या पत्नी सुभद्रा जाधव, बंधू उपमहाराष्ट्र केसरी साहेबराव जाधव, कन्या नीलम श्रीरंग जाधव, मनीषा अशोक शिंदे, शैलजा प्रकाश पवार, वनराज श्रीरंग जाधव, कौस्तुभ वनराज जाधव, अमित अमर जाधव, धनंजय जाधव, वीरेंद्र जाधव, सुनील जाधव, निरंजन जाधव, सतीश जाधव, पै. मंगेश फडतरे महिला कुस्ती प्रशिक्षक गोळे आदी मान्यवर उपस्थित होते.