गडहिंग्लज : संकेश्वरी (जवारी) मिरचीच्या दराने आज ग्राहकांना झटका दिला. आजच्या सौद्यात या मिरचीने प्रतिकिलोला १९०० रुपयाचा भाव खाल्ला. आजपर्यंतच्या इतिहासातील हा उच्चांकी वर असल्याचे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले.
तनवडी (ता. गडहिंग्लज) येथील उत्पादक शिवाप्पा आरबोळे यांनी जवारी मिरची रोहित मांडेकर यांच्या अडत दुकानात आज सौद्याला लावली होती. मे. नानासाहेब जाधव फर्मचे राजन जाधव यांनी ही मिरची एक लाख ९० हजार रुपये क्विंटल (प्रतिकिलो १९०० रुपये) दराने खरेदी केली. दोन वर्षांपूर्वी या मिरचीने १७४० रुपये प्रतिकिलो, असा उच्चांकी भाव खाल्ला होता. या दराचा रेकॉर्ड आज मोडला. यामुळे या जवारी मिरचीने ग्राहकांना ‘जोर का झटका’ दिल्याचे बाजारात चर्चा सुरू झाली होती.
या वर्षी अतिपावसाने या मिरचीचे उत्पादन सुरुवातीला कमी झाले. त्यात डागी मिरचीचे प्रमाण अधिक असल्याने दर कोसळले होते. त्यामुळे ८०० ते १००० रुपये दर या मिरचीला मिळाला. हंगामाचा शेवट मात्र या मिरचीने उत्पादकांचा गोड केला. या दराने उत्पादक शेतकरी आरबोळे यांनी पेढे वाटले. दरवर्षीच जवारी मिरचीला १२०० ते १५०० रुपये किलो असा दर मिळतो.
उत्पादन कमी आणि मागणी अधिक असल्याने दर नेहमीच चढे राहतात. आतापर्यंतच्या इतिहासात किलोला १७४० रुपये दराचा उच्चांक होता. यंदा मिरचीला मिळालेल्या १९०० रुपये दरामुळे हा उच्चांकही मोडला आहे.
‘संकेश्वरी’चे ब्रँडिग व्हावे...
मूळ कर्नाटकातील (संकेश्वर) असलेल्या या मिरचीची जात देशी असल्याचे सांगण्यात येते. मिरचीच्या उत्पादनाला गडहिंग्लज व संकेश्वर सीमाभागातील जमीन, वातावरण पोषक आहे. ही मिरची खाण्यासाठी चवीला व तिखटाला कडक आहे. शिवाय या मिरचीची पूड लवकर खराब होत नाही. त्यामुळे त्याला मोठी मागणीही आहे. मुंबई, पुणे, कोकणला ही मिरची जाते.
गडहिंग्लज व आजरा तालुक्यातील केवळ १२ ते १५ गावांत या मिरचीचे उत्पादन घेतले जाते. मध्यंतरी कृषी विभागाकडून या मिरचीच्या उत्पादकांचा गट तयार करण्याच्या हालचाली होत्या. जिल्हाधिकारी यांच्याकडे तसा क्लास्टरचा प्रस्ताव दिला होता. मात्र, त्यापुढे ही कार्यवाही ठप्प झाली. शासन पातळीवर प्रयत्न झाल्यास मिरचीचे ब्रँडिग होऊ शकते.