छ. शिवरायांच्या दैदिप्यमान पराक्रमाची साक्ष देणारा किल्ले प्रतापगड शेकडो मशालींनी उजळला

ढोल ताशांच्या गजरात भगवे झेंडे फडकावत गडावर नवरात्रोत्सव

by Team Satara Today | published on : 28 September 2025


प्रतापगड  : छत्रपती शिवरायांच्या दैदिप्यमान पराक्रमाची साक्ष देणारा किल्ले प्रतापगड (ता महाबळेश्वर) वर परंपरेप्रमाणे यंदाही अश्विन शुद्ध षष्ठीला मशाल महोत्सव साजरा झाला. शनिवारी रात्री तब्बल ३६६ मशालींनी हा गड उजळून निघाला. हा मशाल महोत्सव पाहण्यासाठी व श्री भवानी मातेचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.

छत्रपती शिवाजी महाराजांनी अश्विन शुद्ध पंचमीला किल्ले प्रतापगडावर भवानी मातेची स्थापना केली. त्या प्रित्यर्थ किल्ले प्रतापगडवासिनी श्री भवानी मातेच्या मंदिरास ३६६ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने हजारो शिवभक्तांनी प्रतापगडावर मशाल महोत्सव साजरा करतात. दरवर्षी नवरात्र उत्सवात शुद्ध पंचमीला हा उत्सव साजरा केला जातो. यंदा शनिवारी आलेल्या या तिथीनुसार हा महोत्सव साजरा झाला.

भवानी मातेची शनिवारी रात्री विधिवत पूजा व गोंधळ झाल्यानंतर ढोल ताशांच्या गजरात ”जय भवानी जय शिवाजी” छत्रपती शिवाजी महाराज की जय च्या जयघोषात मशाली प्रज्वलीत करण्यात आल्या. नगारे, तुतारी, सनई यांच्या मंगलवाद्यात एकेक मशाल पेटत गेली आणि त्यामध्ये गड उजळत गेला. हा कार्यक्रम रात्री उशिरा पर्यंत सुरु होता. या वेळी फटाक्यांची जोरदार आतषबाजी करण्यात आली. भवानी माता मंदिर ते माचीवरील ध्वज बुरुजापर्यंत तटावर या मशाली लावण्यात आल्या. मशालींमुळे गड व परिसर उजळून निघाला. यावेळी किल्ल्याच्या चहूबाजूंनी विद्युत रोषणाई करण्यात आली होती. रात्रीच्या अंधारात माशालींच्या उजेडाने उजळून निघालेला हा गड कॅमेऱ्यात टिपण्यासाठी कार्यकर्ते, भाविकांची धडपड सुरू होती. भाविक व कार्यकर्त्यांसाठी ग्रामस्थांनी महाप्रसादाचे आयोजन केले होते.

मागील अनेक वर्षांपासून येथील हस्तकला केंद्राचे चंद्रकांत आप्पा उतेकर, संतोष जाधव, अभय हवलदार, स्वराज्य ढोल पथक, माय भवानी सामाजिक संस्था, स्वस्तिक ग्रुप, डान्सर पालघर, शिवमुद्राकन प्रतिष्ठान पोलादपूर, प्रतापगड व वाडा कुंभरोशी ग्रामस्थांकडून गडावर या मशाल महोत्सवाचे आयोजन केले जात आहे.


दोन घटांची परंपरा

किल्ले प्रतापगडावर भवानी माता मंदिरात नवरात्रीत दोन घट बसविले जातात. हिंदवी स्वराज्याची स्थापना केली म्हणून एक घट छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने बसवला जातो. तर या हिंदवी स्वराज्याचा पाया मजबूत केला म्हणून दुसरा घट हा राजाराम महाराज यांच्या नावाने बसविला जातो. ही परंपरा अनेक वर्षांपासून सुरु आहे. किल्ले प्रतापगडावरील भवानी माता ही साताऱ्याच्या राजघरण्याचे कुलदैवत आहे. या वेळी नवरात्रोत्सवात विविध धार्मिक कार्यक्रम केले जातात.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
चिमुरडीच्या मृत्यूनंतर ग्रामस्थ आक्रमक; निष्काळजीपणामुळे मृत्यू झाल्याच्या आरोप
पुढील बातमी
पांगारी गावाकडे जाण्याऱ्या रस्त्यावर बिबट्याचे दर्शन

संबंधित बातम्या