सातारा : सातारा शहरासह जिल्ह्यामध्ये संघटनात्मक बांधणी मजबूत आणि व्यापक करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने सातारा शहरातून सभासद नोंदणी सुरू करण्यात आली आहे. या उपक्रमाचा शुभारंभ पोवई नाका शिवतीर्थ येथून छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन करून करण्यात आला. पहिल्या दिवसांमध्ये सुमारे दीडशे युवकांना नवनिर्माण सेनेचे प्राथमिक सदस्यत्व देण्यात आले. सर्वसामान्यांचे प्रश्न घेऊन सातारा जिल्ह्याच्या तळागाळात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ध्येय धोरणे व्यापकपणे पोहोचवणार असून तब्बल दहा हजार सभासदांचे उद्दिष्ट पूर्ण करणार अशी स्पष्ट ग्वाही शहराध्यक्ष राहुल पवार यांनी दिली आहे.
नवनिर्माण सेना सातारा शहराध्यक्ष राहुल पवार यांच्या नेतृत्वाखाली मनसेची सभासद नोंदणी करण्यात आली. 9 मार्च रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विसावा वर्धापन दिन निमित्त पक्षाचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांनी राजगडावर छत्रपती शिवाजी महाराज यांचे दर्शन घेऊन महाराष्ट्रमध्ये मनसेचे सदस्य नोंदणी अभियान राबवले आहे. त्यानुसार सातारचे शहराध्यक्ष राहुल पवार यांच्या अध्यक्षतेखाली पोवई नाका या ठिकाणी सदस्य नोंदणी मोठ्या उत्साहात सुरु झाली. यावेळेस युवक तसेच नागरिकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला आणि ऑनलाईन पद्धत तसेच पक्षाचे फॉर्म भरून सभासद नोंदणीसाठी मोठी गर्दी केली होती.
यावेळेस राहुल पवार यांनी सातारा शहरांमध्ये मनसेचे दहा हजार सभासद करण्याचा संकल्प केला असल्याचे सांगितले तसेच ऑनलाईन पद्धतीने manasenodani.com या साइटवर संपर्क साधून उपक्रमामध्ये सहभागी होऊन आपली नोंदणी करावी, असे आवाहन केले आहे. या उपक्रमामध्ये शहर उपाध्यक्ष अझर शेख, प्रशांत सोडमिसे, विभाग अध्यक्ष संतोष सासवडकर, शाखाध्यक्ष ओंकार साळुंखे, मनोहर चव्हाण,समीर दोडमणीसह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.