पुसेगाव : पुसेगाव, ता. खटाव येथे प.पू. श्री सेवागिरी महाराजांची वार्षिक यात्रा दि. १४ ते दि. २४ डिसेंबर या कालावधीत सलग अकरा दिवस भरणार आहे. महाराष्ट्रातून, तसेच इतर राज्यातून आठ ते नऊ लाख भाविक लोक या कालावधीत पुसेगावात येत असतात. यात्रेचा मुख्य दिवस गुरुवार, दि. १८ डिसेबर असून, या दिवशी प.पु. श्री सेवागिरी महाराज यांचा वार्षिक रथोत्सव साजरा होणार आहे. त्यामुळे पुसेगांव येथे वाहनांची गर्दी होवून वाहतूक व्यवस्थेत अडथळा निर्माण होऊ नये, म्हणून वाहतुकीत बदल करण्यात आला असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी व कोरेगाव उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पुसेगावचे सहायक पोलीस निरीक्षक संदीप पोमण यांनी दिली. दिलेल्या माहितीनुसार पुसेगांव गावातील व परिसरातील रस्त्यावरील वाहतुकीत दि. १४ ते दि. २४ डिसेंबर या कालावधीकरीता खालीलप्रमाणे बदल केला आहे.
प्रवेश बंद व नो पार्कंग खालीलप्रमाणे; दि. १४ ते दि. २४ कालावधीकरीता पुसेगावातील शिवाजी चौकाच्या काही अंतरापर्यंत, वडूज, फलटण, दहिवडी आणि साताराकडून येणाऱ्या जाणाऱ्या राज्य परिवहन बसेसना वगळून सर्व वाहनांना प्रवेश बंद राहणार आहे. छ. शिवाजी चौकालगतच्या सर्वच रस्त्याच्या दुतर्फा वाहनांना ५०० मीटर परिसरात, तसेच श्री सेवागिरी मंदिरापासून दोन्ही बाजूस २०० मीटर अंतरापर्यंत नो पार्किंग झोन करण्यात आहे.
दि १४ रोजी रात्री बारा १२ वाजल्यापासून दि. २४ डिसेंबर मध्यरात्रीपर्यंत खालीलप्रमाणे वाहतूक व्यवस्थेत तात्पुरता बदल आहे. सातारा बाजुकडून दहिवडीकडे जाणारी वाहने नेर फाटा नेर गाव ललगुण - बुध - राजापूर / कुळकजाईमार्ग दहिवडीकडे जातील किंवा विसापूर फाटा विसापूर जाखणगाव- खातगुण कटगुण मार्गे दहिवडी जातील. दहिवडी-सातारा जाणारी वाहने कटगुण, खातगुण, जाखणगाव मार्गे विसापूर, विसापूर फाटा मार्गे साताराकडे जातील किंवा पिंगळी चौकातून वडूज, चौकीचा आंबा, विसापूर फाटा मार्गे साताराकडे जातील. वडूज ते फलटणकडे जाणारी वाहने पुसेगांव गावात न येता खटाव, जाखणगांव, विसापूर फाटा, नेर ललगुण मार्गे फलटणला जातील. तसेच फलटण ते वडूज बाजुकडे जाणारी वाहने, ललगुण, नेर गाव, विसापूर फाटा, जाखणगाव, खटाव मार्गने जातील.वरील नियमांचे उल्लंघन केल्यास महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ५४ अन्वये कारवाईस पात्र राहतील याची सर्व नागरिक आणि वाहन चालकांनी नोंद घ्यावी असे आवाहन पोलिस प्रशासनाने केले आहे.