सातारा : या वर्षातील अखेरचा डिसेंबर महिना उलटायला केवळ काही दिवसांचा अवधी असताना सातारा जिल्ह्यातील लाडक्या बहिणीच्या मनात एकच प्रश्न येत आहे तो म्हणजे कधी येणार...., कधी येणार...., १५०० रुपये खात्यात कधी येणार? दरम्यान, राज्यातील नगरपालिका निवडणुकांचा निकाल २१ डिसेंबर रोजी लागणार असून त्यानंतरच म्हणजे दि. २३ किंवा २४ डिसेंबरला लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी त्यांच्या आरोग्य आणि पोशाखामध्ये सुधारणा करणे, कुटुंबातील महिलांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्रात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यास महाराष्ट्र शासनाने २८ जुन २०२४ रोजी मान्यता दिली. या योजनेमार्फत राज्यातील २१ ते ६५ वयोगटातील पात्र महिलांना प्रति महिना १५०० आर्थिक लाभ दिला जातो. या योजनेत सातारा जिल्ह्यातील बहुतांश महिलांनी आपला सहभाग नोंदवला होता. दि. १८ ऑगस्ट २०२४ रोजी सातारा येथे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये जिल्ह्यातील लाडकी बहीण योजनेचा सन्मान सोहळा आयोजित केला होता. या सोहळ्याला जिल्ह्यातून लाखो महिलांनी आपली उपस्थिती लावली होती.
नोव्हेंबर २०२५ मधील पहिल्या आठवड्यात राज्यातील नगरपालिकांच्या निवडणुकांची घोषणा करण्यात आली. त्यामुळे नोव्हेंबरमधील लाडक्या बहिणीच्या योजनेचा लाभ जिल्ह्यातील अनेक लाडक्या बहिणींना घेता आला नाही. आता डिसेंबर महिना उलटून जात असतानाही नोव्हेंबर महिन्याचा हप्ता अद्याप मिळाला नाही. डिसेंबरचाही हप्ता प्रलंबित आहे. त्यामुळे जिल्ह्यातील लाडक्या बहिणी कधी येणार...., कधी येणार...., १५०० खात्यामध्ये कधी येणार असा प्रश्न उपस्थित करू लागलेल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार नोव्हेंबर आणि डिसेंबर चे दोन्ही हप्ते एकत्रितपणे डिसेंबर महिन्याच्या अखेरीस म्हणजेच २३ किंवा २४ डिसेंबरला खात्यात जमा होण्याची शक्यता आहे मात्र तशी अद्यापही शासनाकडून अधिकृत घोषणा झाली नाही.
बिहार पॅटर्नची पुनरावृत्ती होणार महाराष्ट्रात?
महाराष्ट्रात येणाऱ्या काही काळात होणाऱ्या महानगरपालिकांच्या निवडणुका, उर्वरित नगरपालिका आणि नगरपंचायतीसाठी २० डिसेंबरला मतदान होणार असून निकाल २१ डिसेंबर रोजी लागतील. महापालिका निवडणुकांसाठी १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान तर निकाल १६ जानेवारीला जाहीर होतील. त्यामुळे शासन दोन्ही महिन्यांचे पैसे एकत्र देऊ शकते अशी देखील चर्चा आहे. याचा फायदा शासनाला निवडणूक दरम्यान होऊ शकतो. थोडक्यात बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी तेथील महिलांच्या खात्यावर १० हजार रुपये जमा करण्यात आले होते असे सांगितले जात आहे. महाराष्ट्रात बिहार पॅटर्नची पुनरावृत्ती होऊ शकते असे संकेत प्राप्त होत आहेत.