सातारा : राजधानी सातारा शहरात शिवतीर्थाला मोठे स्थान आहे. आदर्श स्थानाचे जर कोणी पावित्र्य भंग करणार असेल, तेथे गैरप्रकार करणार असतील तर ते आम्ही खपवून घेणार नाही. प्रशासनाने अशा प्रकारांना वेळीच पायबंद घालावा, अन्यथा जिह्यात त्याचे तीव्र पडसाद उमटतील, असा गर्भीत इशारा शिवभक्तांच्यावतीने देण्यात आला. जिल्हा प्रशासनाला अशा आशयाचे निवेदन देण्यात आले. हे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांनी स्वीकारले. दरम्यान, त्यांनीही आम्ही संबंधित विभागास सुचित करतो असे आश्वासित केले.
दोन दिवसांपूर्वी शिवतीर्थ येथे सुरु असलेल्या प्री वेडींग फोटो शुटच्या प्रकरणावरुन साताऱ्यातील शिवभक्त आक्रमक झाले. त्यांनी एकत्रितपणे सातारा जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांना निवेदन देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात एकत्र जमले. त्यामध्ये मनसेचे जिल्हाध्यक्ष युवराज पवार, शिवप्रतिष्ठान हिंदूस्थानचे अभिजित बारटक्के, विश्व हिंदू परिषदेचे जिल्हाध्यक्ष विजयकुमार गाढवे, धर्मवीर युवा मंचचे संस्थापक अॅड. प्रशांत नलावडे, भाजपाचे सातारा शहराध्यक्ष आशिष जेजुरीकर, ठाकरे गटाचे माजी सातारा शहराध्यक्ष बाळासाहेब शिंदे, सकल मराठा मुस्लिम आघाडीचे अरबाज शेख यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
निवेदन देतानाच त्यांनी निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांच्यासमोर कैफियत मांडली. योग्य ती कार्यवाही प्रशासनाकडून व्हावी, अशी विनंती करण्यात आली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना मनसेचे युवराज पवार म्हणाले, समस्त शिवप्रेमींसाठी लाजीरवाणी गोष्ट आहे. आमच्या शिवतीर्थाच्या येथे प्री वेडींगसारखे प्रकार होतात. आणि या प्रशासनाला निवेदन द्यायला लागते आहे. सुरक्षा द्या, तिथली काळजी घ्या ही अतिशय दुर्दैवाची बाब आहे. ज्या छत्रपतींनी स्वराज्य निर्माण केले, राज्यभकारभार चालवला त्या छत्रपतींच्या बाबतीत हे असे होत असेल तर प्रशासनाला लाज वाटली पाहिजे. आपण काय करतो, कुणासाठी करतो. गैरप्रकार होत असताना तुम्ही हातावर हात देवून गप्प बसत असाल तर हे आम्ही काय सहन करुन घेणार नाही. तात्काळ त्यांच्यावर कारवाई न केल्यास जिह्यात तीव्र पडसाद उमटतील, असा इशारा दिला.
तसेच विजय कुमार गाढवे म्हणाले, दोन दिवसांपूर्वी शिवतीर्थाच्या परिसरात शुक्रवार आणि शनिवारी प्री वेडींग शुट चालले होते. छत्रपती शिवरायांच्या राजभूमीत असे प्रकार होत आहेत हे निंदनीय आहे. ज्या कोणत्या अधिकाऱ्याने पावती दिली आहे त्याच्यावरही चौकशी करुन कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करत ते म्हणाले, पुणे जिह्यात धार्मिक स्थळी देवदेवतांचा विटंबनाचा प्रकार घडला असून त्याप्रकरणी ज्या युवकाने हा प्रकार केला आहे, त्याच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.
शिवतीर्थ परिसरात पोलीस बंदोबस्त असावा
अभिजित बारटक्के म्हणाले, राजधानी साताऱ्यात किल्ले अजिंक्यतारा, चार भिंती, शिवतीर्थ या परिसरात पोलीस बंदोबस्त असावा म्हणून मागणी केली आहे. अनेकदा पत्रव्यवहार केला आहे. प्रशासनाने पोलीस बंदोबस्त दिल्यास असे उचित प्रकार घडणार नाहीत. प्रकार टाळाण्यासाठी प्रशासनाने ठोस भूमिका घेतली पाहिजे, अशा भावना व्यक्त केल्या.