सातारा : सातारा शहर आणि परिसरातील वाढत्या अवैध व्यवसायाच्या विरोधात सातारा पोलिसांनी कारवाईचा भडगाव उगारला आहे सातारा शहर सातारा तालुका शाहूपुरी पोलीसआणि स्थानिक गुन्हे शाखा यांनी महाराष्ट्र जुगार कायदा महाराष्ट्र दारूबंदी कायदा कोटपा कायदा एनडीपीएस आणि इतर अनेक कलमांतर्गत कारवाया करून 98 जणांकडून सात लाख 56 हजार 233 रुपयांचा मुद्देममाल हस्तगत केला आहे.
पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्या निर्देशाप्रमाणे सातारा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के, स्थानिक ठाणे गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर, सातारा तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक निलेश तांबे, शाहूपुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सचिन मेत्रे यांच्यासह उपाधीक्षक राजीव नवले यांच्या नेतृत्वाखाली अंतर्गत बारा स्वतंत्र पदके तैनात करण्यात आली होती.
स्वतः पोलीस अधीक्षकांनी या कारवाईचा आढावा घेतला. सातारा पोलिसांनी महाराष्ट्र जुगार कायदा 19 प्रमाणे 39 आरोपींकडून सहा लाख 94 हजार 318 चा मुद्देमाल हस्तगत केला महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार चार आरोपींकडून 44 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. कॉलेज परिसरात तंबाखू बंदी कायद्यानुसार 39 केसेस करून सात हजार आठशे रुपये अन्नसुरक्षा मानक अधिनियम अंतर्गत 34,600 ची कारवाई करण्यात आली .एनडीपीएस ऍक्ट प्रमाणे तीन आरोपींवर स्वतंत्र कारवाई करण्यात आली .सेवन स्टार इमारतीमध्ये पॅराडाईज कॅफेमध्ये असतील कृत्यांसाठी प्रेरणा दिली म्हणून कॅफेमालक आणि इतर चार असे एकूण पाच जणांवर कारवाई करण्यात आली.
शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये जुगार कायद्याप्रमाणे तीन केसेस करून सहा आरोपींकडून 15 हजार 55 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. विविध प्रतिबंधक कायद्यानुसार 70 कारवायांमध्ये 98 आरोपींवर कारवाई करून सात लाख 56 हजार 233 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवायांचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी व अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर यांनी अभिनंदन केले.