कराड : कंटेनरने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार कंटेनरखाली सापडून जागीच ठार झाला. पुणे-बंगळूर आशियाई महामार्गावर येथील कोल्हापूर नाक्यावर गुरुवारी अडीचच्या सुमारास हा अपघात झाला. अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक काहीकाळ ठप्प झाली होती. अशोक शिवराम जमाले (वय ६५, रा. मुंढे, ता. कराड) असे अपघातातील मृताचे नाव आहे.
पोलिस व घटनास्थळावरील माहितीनुसार, अशोक जमाले हे दुचाकीवरून (एमएच ११ एवाय २३९६) कराड येथे घरातील बाजार करण्यासाठी गेले होते. बाजार घेऊन ते मुंढे येथे घरी परतत असताना दुपारी अडीचच्या सुमारास जुन्या पुलावर वाहतूक कोंडी झाल्यामुळे ते कोल्हापूर नाका मार्गे घरी जात होते. अडीचच्या सुमारास ते कोल्हापूर नाका येथे आले असता कंटेनरची (आरडी ०६ जीडी ८३५१) त्यांच्या दुचाकीला धडक बसली.
त्यात दुचाकीस्वार कंटेनरच्या मागील चाकाखाली चिरडल्याने जागीच ठार झाले. अपघाताची माहिती मिळताच दस्तगीर आगा, प्रफुल्ल बाबर, शेखर बर्गे हे तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी महामार्ग व शहर पोलिस ठाण्याला अपघाताची माहिती दिली. घटनास्थळी बघ्यांची गर्दी झाली होती. त्यामुळे कोंडी होऊन वाहतूक ठप्प झाली.