सातारा : महाराष्ट्रातील वाहतूक व्यावसायिक मोटार परिवहन विभाग व पोलीस यांच्या त्रासाच्या विरोधात एकत्र येऊन मंगळवार, दि. १ जुलै रोजीच्या मध्यरात्रीपासून चक्काजाम आंदोलन सुरु करणार आहेत. हा निर्णय सर्व वाहतूकदारांनी स्वच्छेने घेतला असल्याचे राज्य वाहतूक महासंघाचे अध्यक्ष प्रकाश गवळी यांनी सांगतले.
राज्य वाहतूक संघटनेची बैठक सातारा येथे मंगळवारी दुपारी आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी या बैठकीत सर्वानुमते निर्णय घेण्यात आला. या बैठकीमध्ये परिवहन विभाग व पोलीस यांच्याकडून वारंवार नियमावर बोट ठेवून मालवाहतूक चालकांना उपद्रव केला जातो, असेही अनेकांनी मत व्यक्त केले. या बैठकीला सातारा जिल्ह्यातील मालवाहतूकदार बहुसंख्येने उपस्थित होते.
ऑनलाईन दंड, क्लीनर नसल्यास दंड, पार्किंग व्यवस्था नसल्यास ट्रकच्या संदर्भामध्ये दंडाची भूमिका घेणे यामुळे वाहतूक चालकांना प्रचंड मनस्ताप सोसावा लागतो. हे अन्यायकारक असल्याबाबत परिवहन मंत्री यांच्या निदर्शनास आणून देताच त्यांनीही मान्य केले. याबाबत समिती स्थापन करुन देण्याचे आश्वासन दिले. परंतु सुचना देण्यास नकार दिल्यामुळेच सर्वांनी आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. हे आंदोलन दि.१ जुलै रोजी रात्री बारा वाजल्यापासून सुरू होणार असल्याचे वाहतूक महासंघाचे अध्यक्ष प्रकाश गवळी व सचिव धनंजय कुलकर्णी यांनी या बैठकीत सांगितले आहे.