मलकापूर : पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर उड्डाणपुलासाठी वापरलेले लाँचर मशीन उतरविण्याचे काम मंगळवारी पूर्ण झाले. त्यामुळे शिवछावा चौकाने मोकळा श्वास घेतला आहे. यासाठी भली मोठी क्रेन कोल्हापूर नाक्यावर दुसरे लाँचर मशीन उतरवण्यासाठी लाँच करण्यात आली होती.
युनिक उड्डाणपुलाचे सिगमेंट बसवण्याचे काम पूर्ण झाले आहे. या कामासाठी वापरलेले भले मोठे लाँचर मशीन उतरवण्यासाठी शिवछावा चौकातील जागा निश्चित केली होती. हा परिसर अतिशय वर्दळीचा असल्याने प्रशासनाकडून दोनवेळा चाचण्या घेण्यात आल्या होत्या.
हे काम पंधरा दिवसांपासून सुरू होते. लाँचर मशीन उतरविण्याचे काम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी नियोजनबद्ध पावले उचलली. त्यानुसार कोणताही अनुचित प्रकार न घडता मंगळवारी सुखरूपपणे काम पार पडले. सर्व साहित्य काढून झाल्यावर ती क्रेन दुसरे लाँचर मशीन उतरवण्यासाठी कोल्हापूर नाक्यावर दाखल झाली आहे.
युनिक उड्डाणपुलासाठी वापरलेल्या सिगमेंट लाँचरचे एकूण आठ भागांसह अवजड पार्ट होते. एक-एक भाग खाली घेण्यात आला. सहाशे टनांच्या जम्बो क्रेनद्वारे सर्व भाग सुरक्षित व यशस्वीपणे खाली उतरविण्यात आले. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून डी.पी. जैनचे कर्मचारी व वाहतूक पोलिस घटनास्थळी तळ ठोकून होते.