सातारा जिल्हा बँकेचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित; देशपातळीवरील उल्लेखनीय कामगिरीची दखल

by Team Satara Today | published on : 03 February 2026


सातारा :  इव्हेंटलिस्ट कॉन्फरन्स आणि ई प्लस इंटेलेक्चुअल मीडिया ही एक नामांकित कंपनी असून त्यांचे माध्यमातून बँकिंग क्षेत्रामध्ये भरीव  व उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या संस्था व व्यक्ती यांना त्यांनी केलेल्या उल्लेखनिय कामकाजाची दखल घेवून त्या संस्थांचा व व्यक्तींचा पुरस्कार देवून गौरव केला जातो.

या संस्थेच्या वतीने सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष  खा. नितीन पाटील यांना इंडियन बँकिंग असोसिएशनचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी गोपाल भगत यांचे  हस्ते “सर्वोत्कृष्ट चेअरमन” आणि डॉ. राजेंद्र सरकाळे यांना पिंपरी चिंचवड महापालिकेचे माजी पोलीस जॉईंट कमिशनर संजय शिंदे यांचे हस्ते “सर्वोत्कृष्ट मुख्य कार्यकारी अधिकारी” या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. \

सदर पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे उद्घाटन रिझर्व्ह बँकेचे आणि नाबार्डचे संचालक  सतीश मराठे यांचे हस्ते झाले. यावेळी रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक सूचना आणि बँकींग रेग्युलेशन अॅक्टचे परिणाम, अंमलबजावणी अनुषंगाने त्यांनी मार्गदर्शन केले.   

सातारा जिल्हा बँकेचे कामकाज रिझर्व्ह बँक, नाबार्ड यांचे मार्गदर्शक सूचनांनुसार व बँकिंग रेग्युलेशन अॅक्ट व महाराष्ट्र राज्य सहकारी कायद्यातील तरतुदीनुसार केले जाते. जिल्हयाची वैभवशाली परंपरा कायम टिकविण्याकरीता बँकेचे अध्यक्ष  खा.  नितीन पाटील यांचे मार्गदर्शनाखाली संचालक मंडळाने आखून दिलेली ध्येय-धोरणे व त्यांची प्रभावी अंमलबजावणी, जिल्हयातील सर्वसामान्य शेतक-यांची बँकेवर असलेली अढळ निष्ठा, आर्थिक शिस्त, विकास संस्था, सर्व सभासद संस्था, ग्राहक, कर्जदार, हितचिंतक यांच्या सदिच्छा यामुळेच बँक प्रगतीपथावर पोहोचली आहे. कुशल संचालक मंडळ व उत्तम प्रशासन, खर्चात काटकसर, काटकसरीतून बचत, बचतीतून  समृध्दी व समृध्दीतून स्वावलंबन हा सहकाराचा मुलमंत्र घेऊन बँक प्रगतीची घोडदौड करीत आहे. याच सर्वंकष कामकाजाबद्दल बँकेचे अध्यक्ष  खा. नितीन पाटील यांना “उत्कृष्ट अध्यक्ष” या पुरस्काराने सन्मानित केलेले आहे. 

पुरस्काराने बँकेच्या नावलौकिकात भर पडली

या पुरस्काराबद्दल बँकेचे अध्यक्ष खा. नितीन पाटील म्हणाले, सहकारी बँकांचे देशाच्या ग्रामीण विकासात फार मोठे योगदान आहे. आदर्शवत व उज्वल परंपरा, पारदर्शक कारभार तसेच उत्कृष्ट कार्यप्रणाली यामुळे बँकेची ख्याती राज्याबरोबरच देशातही झाली आहे. या पुरस्काराने बँकेच्या नावलौकिकात भर पडली आहे. 


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सुरक्षिततेच्या दृष्टीने साताऱ्यात बसणार उच्च दर्जाचे तीनशे सीसीटीव्ही कॅमेरे; पोलीस यंत्रणेचा प्रस्ताव नियोजन समितीकडे होणार दाखल
पुढील बातमी
चारचाकी वाहनाच्या काचा फोडून नुकसान केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा; एकाच गाडीची ६ वेळा फोडली काच

संबंधित बातम्या