सातारा : महिला सशक्तीकरण, शिक्षण, सामाजिक परिवर्तन आणि समाजहितासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या 'एकल पालक व अनाथ मुली व महिलांचा ' गौरव करण्यासाठी 'आशा फाऊंडेशन, नवी मुंबई' तर्फे यंदा प्रथमच “आशा गौरव पुरस्कार” आयोजित करण्यात येत आहे. निवडीचे निकष पूर्ण करणाऱ्या सातारा जिल्ह्यातील पात्र एकल पालक व अनाथ मुली व महिलांची नावे संस्थेकडे पाठविण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने दि. ८ मार्च २०२६ रोजी हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. समाजातील विविध क्षेत्रांमध्ये शिक्षण, आरोग्य, सामाजिक कार्य, महिला व बालकल्याण, ग्रामीण विकास, उद्योजकता, पर्यावरण, क्रीडा आदी क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या एकल पालक व अनाथ मुलींना 'आशा तेजस्विनी' या पुरस्काराने तसेच ज्या महिलांनी आपल्या बालपणी आई-वडील अथवा दोघांचेही छत्र हरपल्यावरही समाजात स्वतःला सिद्ध केले आहे अशा महिलांना 'आशा स्वयंसिद्धा' या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
'आशा फाऊंडेशन' ही संस्था अनाथ व एकल पालक मुलींच्या शिक्षण, आरोग्य आणि सर्वांगीण विकासासाठी कार्यरत असून आतापर्यंत सातारा व रायगड जिल्ह्यांमधील ४,००० पेक्षा अधिक मुलींपर्यन्त सेवा पोहोचली आहे. महिलांच्या कार्याला योग्य मंच मिळावा व त्यांच्या प्रेरणादायी प्रवासातून समाजात सकारात्मक बदल घडावा, या उद्देशाने हा पुरस्कार उपक्रम राबविण्यात येत आहे.
निवडीचे निकष - आशा तेजस्विनी पुरस्कार - मुलगी एकल पालक किंवा अनाथ असावी, वय वर्षे १० ते २१ , इयत्ता ५ वी ते पदवी शिकत असावी
आशा स्वयंसिद्धा पुरस्कार - बालपणी आई किंवा वडील अथवा दोघांचेही छत्र हरपलेल्या महिला, वय वर्षे २४ वरील, विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय योगदान असलेल्या महिला
नामनिर्देशनासाठी आवाहन - वरील निवडीचे निकष पूर्ण करणाऱ्या सातारा जिल्ह्यातील पात्र एकल पालक व अनाथ मुली व महिलांची नावे संस्थेकडे पाठविण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
नामनिर्देशन पाठविण्याची अंतिम तारीख: १ मार्च २०२६
संपर्क: +91 8356845528 / +91 9067109423
समाजात प्रेरणादायी कार्य करणाऱ्या एकल पालक व अनाथ मुली व महिलांचा सन्मान करण्यासाठी सर्व नागरिक, संस्था, शाळा, महाविद्यालये व सामाजिक संघटनांनी मोठ्या प्रमाणावर नामनिर्देशन पाठवावे, असे आवाहन आशा फाऊंडेशनतर्फे करण्यात येत आहे.