सातारा : सातारा शहराच्या राजकारणाचा गेल्या काही दिवसापासून चर्चेत असलेला मनोमिलनाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला. खासदार उदयनराजे भोसले यांनी यासंदर्भात सोमवारी मोठे वक्तव्य केले. मनोमिलन झालंय त्याची काळजी करू नका. लोकहिता बरोबर जे असतात त्यांच्याशी माझे नेहमीच मनोमिलन आहे. लोकांवर अन्याय झाल्यावरच मी आवाज उठवतो, असे रोखठोक प्रतिपादन खासदार उदयनराजे भोसले यांनी केले.
प्रतापगड प्राधिकरण समितीची सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दालनात बैठक झाली. या बैठकीनंतर उदयनराजे भोसले यांनी पत्रकारांशी विविध प्रश्नांवर संवाद साधला मनोमिलनाच्या संदर्भाने त्यांना छेडले असता ते म्हणाले, तुम्ही पत्रकार खूप हुशार आहात,असे प्रश्न तुम्ही विचारताय त्यात तुमचा दोष नाही. तुमच्या दृष्टिकोनातून तुम्ही बरोबर विचार करताय, कारण प्रसार माध्यमांना सतत नवनवीन माहिती हवी असते. मनोमिलन झाले आहे त्याची काळजी करू नका माझं कोणाशीही वैयक्तिक भांडण नाही. जे लोक हिताचे कामे करतात त्यांच्याशी माझे नेहमीच मनोमिलन राहिले आहे. पत्रकारांनाच का वाटते ? मनोमिलन झालेले नाही, असा प्रतिप्रश्न त्यांनी केला.
लोकप्रतिनिधींना लोकांनी निवडून दिलेले असते त्यांच्या विकासाची कामे निधीच्या माध्यमातून व्हावे ही त्यांची अपेक्षा असते. लोकांच्या हिताच्या विरोधात काम झाल्यावरच मी आवाज उठवतो माझं यात वैयक्तिक काहीही नाही. छत्रपती शिवरायांनी स्वराज्याची बांधणी करताना नेहमीच लोकहिताला प्राधान्य दिले त्यांनी कधीही भेदभाव केला नाही. त्यामुळे लोकप्रतिनिधी हे लोक हिताचेच असावेत आणि त्यांनी सातत्याने लोक हिताच्या सेवेत असले पाहिजे, अशी अपेक्षा उदयनराजे यांनी व्यक्त केली.
प्रतापगड प्राधिकरण समितीच्या संदर्भाने बोलताना ते म्हणाले, अफजलखान वधाच्या शिल्पा संदर्भात तातडीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत लवकरच बैठक लावली जाईल असे आश्वासन हिंदू एकता समितीच्या सदस्यांना दिले आहे.