सातारा : जागतिक स्तरावर नावाजलेली सातारा हिल हाफ मॅरेथॉन २०२६’ यावर्षी रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आली आहे. या बहुप्रतीक्षित स्पर्धेसाठीची ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया सोमवार, दि. ६ एप्रिलपासून सुरू होत असून, यंदाही ही नोंदणी प्रक्रिया दोन टप्प्यांत राबवली जाणार आहे.
नोंदणीचा पहिला टप्पा सोमवार, दि. ६ एप्रिल रोजी सकाळी ६ वाजता सुरू होईल आणि गुरुवार, दि. ९ एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत खुला राहील. इच्छुकांनी प्रथम www.runsatara.com या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन आपले वैयक्तिक प्रोफाईल तयार करायचे आहे. यामध्ये नाव, पत्ता, मोबाईल क्रमांक, ई-मेल, टी-शर्टचा आकार, लिंग आणि जन्मतारीख यासह इतर आवश्यक तपशील भरून पूर्व-नोंदणी करणे अनिवार्य आहे. विशेष म्हणजे, पहिल्या टप्प्यात केवळ माहिती भरायची असून कोणतेही प्रवेश शुल्क भरायचे नाही. ज्या स्पर्धकांनी या पहिल्या टप्प्यात यशस्वीरित्या नोंदणी पूर्ण केली आहे, त्यांनाच दुसऱ्या टप्प्यात प्रवेश दिला जाणार आहे.
नोंदणीचा दुसरा टप्पा रविवार, दि. १२ एप्रिल रोजी सकाळी ६ वाजता सुरू होईल. या टप्प्यात संकेतस्थळावर लॉगीन करून प्रवेश शुल्क भरल्यानंतरच स्पर्धकांचा सहभाग निश्चित मानला जाईल. स्पर्धकांची संख्या मर्यादित असल्याने, जागा उपलब्ध असेपर्यंतच ही संधी मिळेल, याची धावपटूंनी नोंद घेणे आवश्यक आहे. ज्या धावपटूंनी गेल्या वर्षी या स्पर्धेसाठी नोंदणी केली होती, त्यांची माहिती प्रोफाईलमध्ये आधीच उपलब्ध आहे. त्यामुळे त्यांना नाव, पत्ता किंवा आधार क्रमांकासारखी माहिती पुन्हा भरण्याची गरज नाही; केवळ यावर्षीचा टी-शर्टचा आकार आणि मागील वर्षाचे टायमिंग यांसारखी उर्वरित माहिती भरून नोंदणी पूर्ण करता येईल.
स्थानिक धावपटूंना प्रोत्साहन देण्यासाठी सातारा जिल्ह्यातील आधारकार्ड असलेल्या स्पर्धकांना प्रवेश शुल्कात ३० टक्के सवलत जाहीर करण्यात आली आहे. ऑनलाइन नोंदणी करताना रहिवासी पुराव्यासाठी आधारकार्ड अपलोड करणे अनिवार्य असून, एका मोबाईल क्रमांकावरून आणि ई-मेलवरून केवळ एकच नोंदणी करता येणार आहे. दरम्यान, नोंदणी केलेल्या सर्व धावपटूंसाठी दरवर्षीप्रमाणे १६ आठवड्यांचा मोफत प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या प्रशिक्षणाची सुरुवात १७ मे रोजी सकाळी ५:४५ वाजता जिल्हा पोलीस परेड ग्राऊंडवरून होणार असल्याची माहिती संयोजन समितीचे अध्यक्ष आर्किटेक्ट उपेंद्र पंडित आणि रेस डायरेक्टर डॉ. अविनाश शिंदे यांनी दिली आहे.