श्रीक्षेत्र धावडशी येथे अधिकमास निमित्त 362 सत्यनारायण महापूजा उत्साहात संपन्न.

धावडशी ग्रामस्थांनी गेली 73 वर्षांची ही परंपरा अखंडपणे सुरू ठेवली आहे. 

by Team Satara Today | published on : 24 July 2023


सातारा : तालुक्यातील श्री ब्रह्मेंद्र स्वामींचे समाधीस्थळ असलेल्या धावडशी येथील ब्रह्मेंद्र स्वामी समाधी मंदिरात अधिक मासानिमित्त ग्रामस्थांचे वतीने 362 सत्यनारायण महापूजा विविध धार्मिक उपक्रमात पार पडला.

धावडशी येथील ग्रामस्थांनी गेली 73 वर्षांची ही परंपरा अखंडपणे सुरू ठेवली आहे. या सोहळ्यास संपूर्ण जिल्ह्यातून भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. एकाच वेळी 362 सत्यनारायण महापूजा डोळ्यात साठवण्यासाठी आणि दर्शन घेण्यासाठी संपूर्ण जिल्ह्यातूनच नव्हे तर परत जिल्ह्यातूनही हजारो भाविक या उपक्रमासाठी उपस्थित होते. 1951 मध्ये प्रथम अधिक मासानिमित्त अशा सामुदायिक 138 महापूजांचे आयोजन करण्यात आले होते, तेव्हापासून धावडशीत प्रत्येक अधिक महिन्यांमध्ये अशा सामुदायिक सत्यनारायण पूजा आयोजित करत असतात. गावातील भांडणे, राजकारण, हेवेदावे बाजूला ठेवून या सोहळ्याचे आयोजन केले जाते. त्यानुसार यावर्षी पूजेची संख्या 351 ठरली होती. मात्र अनेक उत्साही भाविकांच्या उपस्थितीने या 362 सत्यनारायण महापूजा यशस्वीपणे पार पडल्या.

सोहळ्यानिमित्त रविवारी सकाळी दहा वाजता सत्यनारायण देवाच्या प्रतिमेची ढोल ताशांच्या गजरात भव्य मिरवणूक गावातून काढण्यात आली.  श्री ब्रह्मेंद्र स्वामी मंदिरात ही मिरवणूक आल्यानंतर मंदिरातील सभागृह तसेच परिसराच्या प्रदक्षिणा मार्गातही या 362 पूजा मांडण्यात आल्या होत्या. या पूजेसाठी एकाच ब्राह्मणाच्या मार्गदर्शनातून सर्व पूजा करणाऱ्यांनी विधिवत पूजा संपन्न केली. या आगळ्यावेगळ्या सोहळ्यात बांधण्यात आलेल्या एकत्रित सत्यनारायण पूजा पाहण्यासाठी भाविकांनी रात्री उशिरापर्यंत गर्दी केली होती.

या सोहळ्याचे आयोजन गावातील ग्रामस्थ समितीच्या वतीने करण्यात आले होते. श्री ब्रह्मेंद्र  स्वामींचे दर्शन घेऊन सत्यनारायण महापूजेचा तीर्थप्रसाद घेऊन बाहेर पडताना भाविकांना महाप्रसादाचाही लाभ मिळाला. अशा या आगळ्यावेगळ्या 362 सत्यनारायण महापूजा एकाच वेळी पाहण्याचा योग हजारो भाविकांनी घेतला.

अतिशय सुरेखपणे कर्दळीचे खांब बांधून चौरंगावर बांधण्यात आलेल्या या पूजेचे एक वेगळेच प्रसन्न वातावरण परिसरात पाहायला मिळत होते. भर पावसातही या उपक्रमाचे आयोजन हे विशेष आदर्श आणि प्रेरणादायी ठरत होते...


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
राज्य अजिंक्यपद बॉक्सिंग स्पर्धेत उपांत्यपूर्व सामन्यात सातारच्या शानभाग विद्यालयाचे खेळाडू
पुढील बातमी
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वरील ट्राफिक ब्लॉक साडे तीन तासानंतर संपला

संबंधित बातम्या