अपहरण व मारहाणप्रकरणी मनसेच्या तालुकाध्यक्षांसह तिघांना अटक; शिरवळ पोलिसांची कामगिरी; तरुणाला हनीट्रॅपमध्ये अडकवून मागितली खंडणी

by Team Satara Today | published on : 11 November 2025


शिरवळ : सोशल मिडीयाच्या माध्यमातून संपर्क साधत फलटण तालुक्यातील 35 वर्षीय तरुणाला हनी ट्रँपच्या जाळ्यात ओढून भादे गावच्या हद्दीत बोलावत बेदम मारहाण करणार्‍या व खोटा अँट्रासिटी,विनयभंग अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत खंडणी मागणार्‍या तथाकथित युट्युब पत्रकार, तडीपार युवक, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या खंडाळा तालुकाध्यक्षासह तिघांच्या मुसक्या शिरवळ पोलिसांनी अवघ्या एक तासांमध्ये आवळल्या आहे. यामध्ये तथाकथित युट्युब पत्रकार किरण प्रकाश मोरे (मूळ रा. कर्नावड ता. भोर, जि. पुणे, सध्या रा. शिरवळ, ता. खंडाळा),सातारा जिल्ह्यातून तडीपार असलेला विशाल महादेव जाधव, महाराष्ट्र नवनिर्माण सेना खंडाळा तालुकाध्यक्ष इरफान दिलावर शेख (दोघे रा.शिरवळ ता.खंडाळा)असे जेरबंद केलेल्या संशयितांची नावे आहेत.

याबाबतची शिरवळ पोलिसांनी दिलेली माहिती अशी, फलटण तालुक्यातील 35 वर्षीय युवकाशी इन्स्टाग्रामवरुन महिलेच्या नावाने संपर्क साधत चॅटिंग करुन दुरध्वनीद्वारे संपर्क साधत तरुणाला भादे, ता. खंडाळा गावच्या हद्दीत असणार्‍या वीर धरण परिसरात बोलावले. संबंधित तरुण कार (क्रं. एमएच 12 एनई 3972) ने तिथे आल्यानंतर दोन दुचाकीवरुन आलेल्या युट्युब पत्रकार असणार्‍या किरण मोरे, तडीपार असलेल्या विशाल जाधव यांनी कारमध्ये घुसत तरुणाचे अपहरण केेले. यावेळी तरुणाला फायबर काठी, हाताने तोंडावर व पाठीवर बेदम मारहाण करीत घटनेबाबत कोणाला काही सांगितल्यास खोटा अ‍ॅट्रासिटी व विनयभंग अत्याचाराचा गुन्हा दाखल करत जेलमध्ये टाकण्याची धमकी दिली. तसेच खंडणी स्वरुपात तरुणाची कार किरण मोरे याच्या नावावर करण्याची धमकी तरुणाला व कुंटुंबियांना संबंधित देत होते.

संबंधित तरुणाने शिरवळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्यानंतर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक तुषार दोषी,अ पर पोलीस अधिक्षक डॉ. वैशाली कडुकर,फलटणचे पोलीस उपअधीक्षक विशाल खांबे यांनी शिरवळ पोलीस निरीक्षक यशवंत नलावडे यांना गुन्हा उघडकीस आणण्याचे निर्देश दिले होते.

त्यानुसार शिरवळ पोलीस निरीक्षक यशवंत नलावडे यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक किर्ती म्हस्के, पोलीस उपनिरीक्षक सतीश आंदेलवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीसांची विविध पथके तयार करीत गुन्ह्यातील संशयितांच्या मुसक्या अवघ्या एक तासांमध्ये आवळत शिरवळ पोलिसांनी अटक केली. संशयितांना खंडाळा येथील न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने बुधवार दि.12 नोव्हेंबरपर्यंत तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेची नोंद शिरवळ पोलीस स्टेशनला झाली असून पोलीस उपनिरीक्षक सतिश आंदेलवार हे अधिक तपास करीत आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
कासमधील पर्यटकांचा ऐतिहासिक बंगला कुलूपबंद दारे खिडक्या गंजून गेल्या; विघ्नसंतोषी लोकांकडून बंगल्याची नासधूस
पुढील बातमी
स्थानिक स्वराज्य निवडणुकांसाठी मेघदूतवर ठरली रणनीती; ना. शंभूराज देसाई यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचा रणनाद

संबंधित बातम्या