भरधाव दुचाकीची कंटेनरला धडक

बिळाशीचा एकजण जागीच ठार

by Team Satara Today | published on : 11 August 2025


सातारा : काशीळ-सातारा रस्त्याजवळ उभ्या असलेल्या कंटेनरला भरधाव दुचाकी धडकून झालेल्या अपघातात बिळाशी (ता. शिराळा) येथील दत्तात्रय आनंदा पाटील यांचा जागीच मृत्यू झाला. तर पाठीमागे बसलेले संतोष वासुदेव शिंदे गंभीर जखमी झाले. अपघाताची नोंद बोरगाव (सातारा) पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. या घटनेमुळे बिळाशी परिसरात शोककळा पसरली आहे.

शनिवारी दुपारी ४:३० वाजण्याच्या सुमारास बिळाशी येथील संतोष वासुदेव शिंदे (वय ४०) हे दत्तात्रय आनंदा पाटील (वय ४०) यांना सोबत घेऊन दुचाकीवरून (क्र. एमएच १०-१०५३) आपल्या सासूरवाडी शेंद्रे (ता. जि. सातारा) येथे गेले होते. नुकत्याच जन्मलेल्या बाळास पाहून ते परत येत होते.

सायंकाळी ७:३० वाजण्याच्या सुमारास काशीळ फाट्याच्या पुढे रॉयल हॉटेलसमोर दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने उभ्या असलेल्या ट्रकवर जाऊन धडकले. या अपघातात दत्तात्रय पाटील आणि संतोष शिंदे या दोघांनाही डोक्याला जबर मार लागल्याने ते खाली पडले. 

घटनेची गंभीरता ओळखून स्थानिकांनी १०८ रुग्णवाहिकेतून दोघांना ग्रामीण रुग्णालय सातारा येथे नेले. मात्र, दत्तात्रय पाटील यांचा वाटेतच मृत्यू झाला. तर संतोष शिंदे यांना सातारा येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. रविवार, दि. १० रोजी बिळाशी येथे दत्तात्रय पाटील यांच्या पार्थिवावर अंत्यविधी करण्यात आला. रक्षाबंधनाच्या दिवशी घडलेल्या या घटनेने बिळाशी गावात हळहळ व्यक्त होत आहे.



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
गणेश आगमन मिरवणुकीत डॉल्बी आणि लेझर लाईटचा वापर केल्याप्रकरणी पोलिसांची कारवाई
पुढील बातमी
ट्रॅक्टरला ब्लॅक बॉक्स सक्ती

संबंधित बातम्या