सातारा : सातारा जिल्ह्यातील एकूण १७ साखर कारखाने चालू गळीत हंगामात ऊस गाळप करूनही मागील दोन महिन्यांपासून शेतकऱ्यांची बिले मुद्दाम थकवून ठेवत आहेत. काही कारखान्यांनी अद्याप ऊस दरही जाहीर केलेले नाहीत. हे कृत्य म्हणजे शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशावर उघडपणे दरोडा टाकण्यासारखे आहे. ऊस नियंत्रण कायदा १९६६ नुसार १४ दिवसांत ऊस बिले अदा करणे कायदेशीर बंधनकारक असताना, संबंधित साखर कारखाने या कायद्याला जुमानत नाहीत. या कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करा अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली आहे. शुक्रवारी जिल्हाध्यक्ष राजू शेळके आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी जिल्हाधिकारी संतोष पाटील यांना निवेदन सादर केले
पुढे निवेदनात नमूद आहे की हा प्रकार म्हणजे कायद्याची थट्टा असून प्रशासनाच्या दुर्लक्षामुळेच कारखानदारांची मग्रुरी वाढली आहे, हे स्पष्ट दिसून येते. या गंभीर विषयावर यापूर्वी अनेक वेळा आपल्या कार्यालयास निवेदने देऊनही जिल्हा प्रशासनाने अद्याप कोणतीही ठोस कारवाई न करणे हे शेतकऱ्यांवरील अन्यायास प्रोत्साहन देणारे आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला असून कर्जबाजारीपणा, आत्महत्येसारख्या टोकाच्या परिस्थितीकडे ढकलला जात आहे.तरी आपणास स्पष्ट शब्दांत सांगण्यात येते की, ऊस नियंत्रण कायदा १९६६ चे उल्लंघन करणाऱ्या सर्व साखर कारखान्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करून परवाने रद्द करण्याची प्रक्रिया तात्काळ सुरू करावी.
शेतकऱ्यांची सर्व थकीत ऊस बिले व्याजासह त्वरित अदा करण्याचे आदेश कारखान्यांना द्यावेत. जाणीवपूर्वक बिल थकवणाऱ्या कारखानदारांवर कठोर कारवाई न झाल्यास जिल्हा प्रशासनालाही जबाबदार धरले जाईल. जर येत्या ४ दिवसांत फलटण तालुक्यातील स्वराज ऍग्रो प्रायव्हेट लिमिटेड व श्रीराम जवाहर या दोन कारखान्याने प्रति टन ऊसाचा पहिला हप्ता 3200 व दिवाळीसाठी 200, अशाप्रकारे फलटण तालुक्यातील इतर कारखान्याप्रमाणे ऊस दर जाहीर करावा जाहीर करावा. जर शेतकऱ्यांची संपूर्ण देयके अदा झाले नाहीत, तर स्वाभिमानी शेतकरी संघटना, सातारा जिल्ह्याच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर तीव्र आंदोलन, रास्ता रोको व कारखान्यांचे गेट बंद आंदोलन छेडण्यात येईल. यामुळे निर्माण होणाऱ्या कायदा-सुव्यवस्थेच्या परिस्थितीस संपूर्णपणे जिल्हा प्रशासन व संबंधित साखर कारखाने जबाबदार राहतील.असा इशारा देण्यात आला आहे .
यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटना, सातारा जिल्हा जिल्हाध्यक्ष - राजू शेळके, धनंजय महामुलकर, सातारा जिल्हाध्यक्ष पुर्व विभाग ,श्री. अर्जुन भाऊ साळुंखे राज्य कार्यकारिणी सदस्य श्री.नितीन यादव, फलटण तालुका अध्यक्ष ,श्री.रविंद्र घाडगे प्रमोद गाडे, युवक राज्य प्रवक्ते ,बाळासाहेब शिपुकले, महादेव डोंगरे, सतीश साळुंखे इत्यादी यावेळी उपस्थित होते.