बाजार समितीच्या प्रशस्त संकुलाला राज्यशासन सर्वतोपरी सहकार्य करणार

उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची आमदार शिवेंद्रसिंहराजे यांना ग्वाही

by Team Satara Today | published on : 09 August 2024


सातारा : सातारा तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कैलासवासी श्रीमंत छत्रपती अभयसिंहराजे भोसले यांच्या नावाने खिंडवाडी च्या माळावर होणारा भव्य उपबाजार हा 15 एकर जागेवर उभा राहत आहे. याकरिता तब्बल 130 कोटी रुपये खर्च येणार आहे. या संकुलात शेतकरी, व्यापारी, हमाल, ग्राहक यांच्यासाठी सर्व सोयीसुविधा देण्यात येणार आहेत. ही इमारत विनाकर्ज उभारण्याचा आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा मानस आहे. मात्र या प्रकल्पास गरज पडल्यास राज्य शासन सर्वतोपरी सहकार्य करेल, असे स्पष्ट आश्वासन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना दिले.
खिंडवाडी, ता. सातारा येथील सातारा तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कैलासवासी श्रीमंत छत्रपती अभयसिंहराजे भोसले बाजार व्यापारी संकुलाचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते यावेळी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक समीर शेख, जिल्हा निबंधक मनोहर माळी, जिल्हा कृषी अधीक्षक भाग्यश्री फरांदे, भाजप जिल्हाध्यक्ष धैर्यशीलदादा कदम इत्यादी यावेळी उपस्थित होते.
फडणवीस पुढे म्हणाले, बाजार समितीची प्रशस्त इमारत 15 एकर जागेवर उभी राहत आहे ही आनंदाची गोष्ट आहे. हा उपबाजार महाराष्ट्रातील सर्वात मोठा आणि अत्याधुनिक बाजार ठरावा. संकुल उभारणीच्या माध्यमातून कैलासवासी श्रीमंत छत्रपती अभयसिंहराजे भोसले यांची स्वप्नपूर्ती होणार आहे. शेतकर्‍याला जर बाजार समितीच्या निमित्ताने चांगल्या सुविधा मिळाल्या तर शेतमालाला सुद्धा चांगला भाव मिळतो आणि बाजार समितीची ही इमारत शेतकरी, व्यापारी, हमाल यांना हक्काची ठरणार आहे. सातारा जिल्हा शूरवीरांचा, कष्टकरी शेतकर्‍यांचा जिल्हा आहे. येथील पिके ही इतर जिल्ह्यात तसेच परदेशातही जातात. शेतकर्‍यांच्या माल साठवणुकीच्या सर्व सुविधा या संकुलामध्ये आहेत. हा महत्त्वाकांशी प्रकल्प पश्चिम महाराष्ट्रात उभा राहतो आहे याबद्दल आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे कौतुक करावे तितके थोडेच आहे. संकुलाच्या उभारणीसाठी कोणतीही मदत न घेण्याचा निर्धार आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी केला आहे. मात्र तरीही संकुलाच्या उभारणीसाठी शासन सर्वतोपरी निश्चित सहकार्य करेल, असे आश्वासन फडणवीस यांनी दिले.
प्रास्ताविकामध्ये आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले, उपबाजार समितीचे व्यापारी संकुल हे पंचतारांकित पद्धतीचे आहे. हे संकुल पंधरा एकर जागेत उभारले जात आहे. शेतकरी, व्यापारी, ग्राहक यांच्या सोयी सुविधा येथे असणार आहेत. सातारा शहरात बाजार समिती असल्यामुळे वाहतुकीची कोंडी होत आहे. लवकरच येथे भाजीपाला व फळ मार्केट सुरू होत असून जनावरांचा बाजारही भरवला जाणार आहे. हा बाजार पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गालगत असल्यामुळे शेतकर्‍यांच्या मालाची वाहतूक सुरळीत होण्यास मदत होणार आहे. या संकुलाच्या उभारणीमुळे शेतकर्‍यांच्या विकासाबरोबर सातारा शहराचाही विकास होणार आहे. यावेळी सातारा कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन एडवोकेट विक्रम पवार यांचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
भाजपचे जिल्हा कार्यालय लोकाभिमुख व्हावे
पुढील बातमी
पुनर्रचनेद्वारे अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाला बळकटी

संबंधित बातम्या