सातारा : धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या चरित्रावर आधारित ऐतिहासिक छावा चित्रपट प्रदर्शनाला तयार आहे. मात्र त्या चित्रपटात छत्रपती संभाजीराजे हे एका दृश्यामध्ये नृत्य करताना दिसले आहेत. या संदर्भात येसूबाई फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सुहास राजेशिर्के यांनी सातार्यातून चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही, यासंदर्भात इशारा दिला आहे. या वादात खासदार उदयनराजे भोसले यांनी मध्यस्थी करीत सदर दृश्यांविषयी आपण इतिहास तज्ञांची आपण चर्चा करावी, अशी सूचना केली. या सूचनेला उतेकर यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याची माहिती मिळत आहे.
छावा चित्रपट येत्या काही दिवसांमध्ये संपूर्ण राज्यात प्रदर्शित होत आहे. यामध्ये छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका अभिनेता विकी कौशल आणि स्वराज्याच्या कुलमुखत्यार आणि संभाजीराजे यांच्या पत्नी येसूबाई यांची भूमिका अभिनेत्री रश्मिका मंदाना यांनी केली आहे. या चित्रपटात लेझीम खेळ प्रकारावर छत्रपती संभाजी महाराज नृत्य करताना दाखवण्यात आले आहेत. या प्रकारावर सातार्यातून येसूबाई फाउंडेशनचे संस्थापक माजी उपनगराध्यक्ष सुहास राजेशिर्के यांनी टीका करत संताप व्यक्त केला आहे. तसेच संबंधित दिग्दर्शक व निर्मात्यांवर अब्रूनुकसानीचा दावा ठोकू व चित्रपट प्रदर्शित होऊ न देण्याचा इशारा दिला. याबाबत सातार्यातून खासदार उदयनराजे भोसले यांनी या प्रकरणी थेट चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांच्याशी चर्चा केली.
चित्रपट अत्यंत सुंदर झाल्याचे उदयनराजे यांनी आवर्जून सांगितले. मात्र संबंधित दृश्यांसंदर्भात आपण इतिहास तज्ञांशी चर्चा करावी आणि सातार्यातील राजघराण्याला आणि छत्रपती शिवरायांना संपूर्ण भारत विशेषतः महाराष्ट्रातील लोक देवस्थानी मानतात. त्यामुळे त्यांच्या भावना तीव्र असतात. या भावना जपल्या जाव्यात. म्हणून सदर दृश्याबाबत आपण पुन्हा विचार करावा, अशी सूचना त्यांनी केली. उत्तेकर यांनी या चित्रपटाचा प्रत्येक सीन हा अत्यंत अभ्यासपूर्ण चित्रित करण्यात आलेला आहे. तरीसुद्धा याबाबत आपण नक्कीच त्या दृश्या संदर्भात चर्चा करू आणि छत्रपती संभाजी महाराजांची चारित्र्य पुढील पिढीला प्रेरणा देणारे कसे राहील अशीच दृश्यात्मकता चित्रपटात असेल, असे आश्वासन त्यांनी दिले.