फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयात अज्ञात व्यक्तीकडून डॉक्टरला मारहाण ; कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन ; कडक कारवाईची मागणी

by Team Satara Today | published on : 10 December 2025


सातारा : डॉ. संपदा मुंडे यांनी आत्महत्या केल्यानंतर संपूर्ण देशाला परिचित झालेल्या फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयात आईशी उद्धट बोलण्याच्या कारणावरून संबंधित महिलेच्या मुलाने आज एका डॉक्टरला उपजिल्हा रुग्णालयात मारहाण केल्याची घटना घडल्यामुळे वैद्यकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, या घटनेचा निषेध करण्यासाठी उपजिल्हा रुग्णालयातील अन्य डॉक्टर व कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरू केले असून संबंधित व्यक्तीवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी, काल एक व्यक्ती आपल्या आईला फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी घेऊन आला होता. केस पेपर काढल्यानंतर संबंधित महिलेवर डॉक्टर गायकवाड यांनी उपचार केले होते. उपचार करत असताना संबंधित व्यक्तीची भाषा योग्य नसल्याचे कालच गायकवाड यांनी व्यवस्थापनाला सांगितले होते. आज सकाळी नेहमीप्रमाणे उपजिल्हा रुग्णालयात ओपीडी सुरू असताना ११.१५ वाजण्याच्या सुमारास संबंधित व्यक्ती आणखीन तीन-चार जणांना घेऊन रुग्णालयात आला. त्या ठिकाणी काल तुम्ही माझ्या आईची उद्धट का बोलला असे म्हणत त्यांना मारहाण केली. या घटनेमुळे रुग्णालयात एकच खळबळ उडाली. डॉक्टरांना मारहाण झाल्याची माहिती मिळताच रुग्णालयातील अन्य डॉक्टर व कर्मचाऱ्यांनी तातडीने काम बंद आंदोलन सुरू करत घडलेल्या घटनेची माहिती आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना देत फलटण पोलीस ठाण्यात संबंधित व्यक्तीच्या विरोधात तक्रार दाखल केली. काम बंद आंदोलन सुरू केलेल्या अन्य कर्मचाऱ्यांनी संबंधित व्यक्तीवर कडक कारवाई करण्याची मागणी पोलिसांकडे केली असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

रुग्णालय दुसरीकडे न्या अथवा आम्हाला दुसरीकडे पाठवा 

काम बंद आंदोलन सुरू केलेल्या कर्मचाऱ्यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना हा रोजचा त्रास सुरू असून किती दिवस शांत बसायचे असा प्रश्न उपस्थित करत एकतर फलटणचे उपजिल्हा रुग्णालय दुसरीकडे न्या अथवा आम्हाला तरी दुसरीकडे पाठवा अशी मागणी त्यांनी केली आहे. 

असाही योगायोग..‌...

फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. संपदा मुंडे यांनी फलटण येथील एका लॉजमध्ये आत्महत्या केल्यानंतर फलटण उपजिल्हा रुग्णालयाचे नाव देशभरात पोहोचले. आज विरोधकांनी नागपूर येथील विधान भवनाबाहेर आंदोलन केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डॉ. संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणी सभागृहात सविस्तर निवेदन केले. या निवेदनानंतर काही वेळातच उपजिल्हा रुग्णालयातील एका डॉक्टरला मारहाण झाल्यामुळे हा योगायोग की आणखी काही? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
जिल्हा हिंदी अध्यापक मंडळाच्या शिक्षक निबंध स्पर्धेचा निकाल जाहीर; जानेवारीच्या अंतिम रविवारी पुरस्कार प्रदान करणार
पुढील बातमी
निर्णय घेण्याच्या अनुषंगाने सुरु झालेल्या हालचालीमुळे झेडपी समोरील अधिकाऱ्यांच्या आंदोलनास स्थगिती

संबंधित बातम्या