साताऱ्याच्या पोलिस क्रीडा प्रबोधिनीचा जागतिक ठसा !

आशियाई बॉक्सिंग स्पर्धेत भारतासाठी पहिल्यांदाच दोन कांस्य पदकं

by Team Satara Today | published on : 01 May 2025


सातारा : सातारा जिल्हा पोलीस क्रीडा प्रबोधिनीतील प्रशिक्षणार्थींनी आंतरराष्ट्रीय पातळीवर अभूतपूर्व यश संपादन करत संपूर्ण जिल्ह्याचा, राज्याचा आणि देशाचा मान उंचावला आहे. जॉर्डन (अमन) येथे १८ एप्रिल ते १ मे २०२५ दरम्यान पार पडत असलेल्या १५ वर्षांखालील आशियाई बॉक्सिंग क्रीडा स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करताना, सातारा प्रबोधिनीतील कुमार यश बबन निकम (३०-३३ किलो वजनी गट) आणि कुमारी समृद्धी सतीश शिंदे (५२-५५ किलो वजनी गट) या दोघांनी कांस्य पदकांची कमाई केली. या स्पर्धांमध्ये भारताला पदक मिळवून देणारे हे साताऱ्यातील पहिले पुरुष आणि महिला खेळाडू ठरले आहेत – हे त्यांच्या यशाचे विशेष वैशिष्ट्य!

सातारा जिल्हा पोलीस दलाच्या पुढाकाराने सुरु झालेल्या या प्रबोधिनीच्या माध्यमातून सातत्याने प्रतिभावान आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडत आहेत. प्रशिक्षण, सुविधा आणि मार्गदर्शन यांचा उत्कृष्ट मिलाफ इथे घडवून आणला जातो. या यशस्वी कामगिरीमागे सुनिल सपकाळ (स्पोर्ट्स इन्चार्ज), श्री. सॅम्युअल भोरे (सहा. स्पोर्ट इन्चार्ज), पोहवा/१९० सागर जगताप (NIS बॉक्सिंग प्रशिक्षक), आणि मपोकॉ/८४ पूजा शिंदे (बॉक्सिंग प्रशिक्षक) यांचे अतुलनीय योगदान आहे. खेळाडूंना शास्त्रशुद्ध प्रशिक्षण आणि मानसिक तयारी दिल्यामुळे त्यांनी आंतरराष्ट्रीय स्पर्धेतही सहज चमक दाखवली.

या ऐतिहासिक यशाबद्दल पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर, पोलीस उपअधीक्षक अतुल सबनीस, राखीव पोलीस निरीक्षक श्री. राजू शिंदे, तसेच पोलीस उपनिरीक्षक सुनिल चिखले यांनी विजेत्या खेळाडूंना आणि त्यांच्या प्रशिक्षकांना मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

साताऱ्याच्या मातीतून घडलेल्या या दोघा खेळाडूंनी केवळ पदकच जिंकले नाही, तर जिल्ह्याच्या युवा पिढीसाठी प्रेरणास्तंभ ठरले आहेत. त्यांच्या यशामुळे संपूर्ण जिल्ह्यात आनंदाचे आणि अभिमानाचे वातावरण आहे.  हे केवळ पदक नाही, तर साताऱ्याच्या यशाची आणि जिद्दीची जागतिक पातळीवर उमटलेली साक्ष आहे!


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
वाढदिनी अभिनेत्री समांथाच्या नावाने एका चाहत्याने चक्क मंदिर उभारले
पुढील बातमी
विचारवेध व्याख्यानमालेच्या पार्श्वभूमीवर गीतमैफिल कार्यक्रम उत्साहात !

संबंधित बातम्या