नूतन पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांनी स्वीकारला पदभार

by Team Satara Today | published on : 23 May 2025


सातारा : आयपीएस दर्जाच्या पोलिस अधिकार्‍यांच्या बदल्या गुरुवारी दुपारी झाल्या असून तुषार दोशी यांची सातारच्या नूतन पोलिस अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ते यापूर्वी पोलिस अधीक्षक लोहमार्ग, पुणे येथे कर्तव्य बजावत होते. गुरुवारी संध्याकाळी त्यांनी सातारचा कार्यभार स्वीकारला. दरम्यान, सातारचे एसपी समीर शेख यांची बृहन्मुंबई येथे पोलिस उपायुक्तपदी बदली झाली आहे.

एसपी तुषार दोशी हे मूळचे महाड जिल्हा रायगड येथील आहेत. फर्ग्युसन कॉलेज पुणे येथून त्यांनी बी.एस्सी. पूर्ण केली आहे. त्यांची 2000 साली पोलिस उपअधीक्षक म्हणून निवड झाली. नाशिक येथे त्यांनी प्रशिक्षण घेतले. पहिली पोस्टींग चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा येथे नक्षली प्रभाव असलेल्या ठिकाणी झाली. त्यानंतर आतापर्यंत त्यांनी लातूर शहर, सोलापूर, पुणे, नवी मुंबई, जालना येथे कर्तव्य बजावले आहे.

तुषार दोशी यांना 2014 साली पदोन्नती मिळल्यावर ते पोलिस अधीक्षक झाले. त्यांनी पोलिस अधीक्षक म्हणून पुणे एटीएस, जालना, रेल्वे पुणे येथे कर्तव्य बजावले आहे. दरम्यान, नवी मुंबई क्राईमचे डीसीपी असताना अनेक क्लिष्ट गुन्ह्यांचा यशस्वी तपास केला आहे. सातार्‍यात त्यांच्या पुढे कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवून गुन्ह्यांचा छडा लावणे. पुसेसावळी सारखे जातीय तेढ निर्माण होणार नाहीत यासाठी प्रयत्न, पोलिस कर्मचार्‍यांना पोलिस वसाहतीचा लाभ कसा देता येईल, पोलिस कर्मचार्‍यांच्या पारदर्शी बदल्या, अशी आव्हाने राहणार आहेत.

दरम्यान, गुरूवारी संध्याकाळी नूतन पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांनी पोलिस मुख्यालयात कार्यभार स्वीकारला. यावेळी एसपी समीर शेख, अप्पर पोलिस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर तसेच पोलिस अधिकारी उपस्थित होते.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पुर्व प्रशिक्षणासाठी मोफत सुवर्णसंधी
पुढील बातमी
अंगणवाड्यात आता नवा अभ्यासक्रम

संबंधित बातम्या