घरफोडीतील सराईत गुन्हेगार थरारक पाठलागानंतर अखेर जेरबंद; सातारा डीबीची कारवाई

by Team Satara Today | published on : 28 November 2025


सातारा  : सातारा शहर गुन्हे प्रकटीकरण पथकाने (डी.बी. पथक) अतिशय धाडसी कारवाई करत तीन वर्षांपासून फरार असलेल्या सातारा तालुका पोलीस ठाणे हद्दीत घरफोडीतील सराईत आरोपीला थरारक पाठलागानंतर जेरबंद करण्यात यश मिळवले. सतत पोलिसांना चकवा देत फरारी जीवन जगणारा आणि पळून जाण्यात पारंगत असलेला हा वॉन्टेड गुन्हेगार अखेर पथकाच्या अचूक माहिती, नियोजनबद्ध पाळत आणि शिताफीने रचलेल्या सापळ्यात अडकला.

यााबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. २५ नोव्हेंबर २०२५ रोजी डी.बी. पथकास खात्रीशीर माहिती मिळाली की, सातारा तालुका पोलीस ठाण्यातील घरफोडीच्या तीन गुन्ह्यांमध्ये फरार असलेला आरोपी मयूर शहाजा भोसले (वय २५, रा. आसगाव, ता. सातारा) हा कोडोली परिसरात घरफोडी करण्यासाठी येणार आहे. त्यानुसार दत्तनगर कॅनॉल व पाच एकर शिवार परिसरात पथकाने रात्रीच्यावेळी रणनीतीपूर्वक पाळत ठेवली.

सराईत व खुनशी प्रवृत्तीचा हा आरोपी अंधाराचा फायदा घेऊन शेतातील झाडी, झुडपे, कडेकपारीतून पळून जाण्यात पटाईत असल्याची माहिती पथकाला आधीच होती. त्यामुळे डी.बी. पथकाने विविध दिशांनी शिवारात घेराबंदी करत गवत, झाडीझुडपांचा आड घेऊन दबा धरून बसले होते. चाहूल लागताच आरोपीचा पळून जाण्याचा प्रयत्न होता. मात्र पोलिसांनी वेढा घालून पकडला

पथकातील एका टीमने सावधगिरीने आरोपीकडे सरकण्यास सुरुवात करताच त्याला चाहूल लागली आणि तो धावत झाडीतून पळ काढू लागला. मात्र इतर बाजूंनी आधीच घेराबंदी केल्याने त्याचा पलायनाचा मार्ग बंद झाला. झाडीझुडपात दबा धरून बसलेल्या पोलिसांनी योग्य क्षणी झडप घालत त्याला पकडले.ताब्यात घेतल्यानंतरही आरोपीने झटापट करत पुन्हा पळून जाण्याचा अटोकाट प्रयत्न केला; परंतु पथकाने आवश्यक बळाचा वापर करून त्याला अखेर पूर्णपणे जेरबंद केले.

आरोपीकडून लाखो रुपये किंमतीचे महागडे मोबाईल फोन आणि एक महागडी स्पोर्ट्स बाईक ताब्यात घेण्यात आली आहे. संबंधित साहित्य घरफोडीतील असल्याचा संशय असून याबाबत सातारा तालुका पोलीस ठाण्यात अधिक तपास सुरू आहे. 

ही कारवाई पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर, उपविभागीय पोलीस अधिकारी, सातारा राजीव नवले, वरीष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली पो. उपनिरीक्षक सुधीर मोरे, पोलिस हवालदार सुजीत भोसले, निलेश यादव, निलेश जाधव, विक्रम माने, प्रविण कडव, पो. ना. पंकज मोहिते, पो. कॉन्स्टेबल तुषार भोसले, सागर गायकवाड, सचिन रिटे, संतोष घाडगे, मच्छद्रिंनाथ माने, आशिकेष डोळस, वैभव माने, सुशांत कदम, सुहास कदम यांनी केली.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
वाढे फाटा येथे हॉटेलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी
पुढील बातमी
पिस्तूल घेऊन फिरणार्‍यास कराडमध्ये अटक; जिवंत काडतुसासह 66 हजारांचा मुद्देमाल जप्त

संबंधित बातम्या