याच साठी केला होता अट्टाहास!

मतदानाचा हक्क बजावतानाच तीव्र हृदयविकाराच्या झटक्याने एकाचा मृत्यू

by Team Satara Today | published on : 20 November 2024


सातारा : मोरवे, ता. खंडाळा येथील एका व्यक्तीला मतदानकेंद्रामध्ये मतदानाचा हक्क बजावतानाच तीव्र हृदयविकाराचा झटका आला. यानंतर त्यांना रुग्णालयात उपचारासाठी नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

राज्यभरात आज विधानसभा निवडणुकीचे मतदान होत आहे. या पार्श्‍वभूमीवर मोरवे, ता. खंडाळा येथील प्राथमिक शाळेमध्ये प्रशासनाकडून निवडणूक कक्षात मतदान सुरु होते. यावेळी शाम नानासाहेब धायगुडे वय 67 हे आपल्या मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदानकेंद्रावर दाखल झाले. ओळखपत्राची पडताळणी झाल्यानंतर ते इव्हीएम कक्ष (मतदान यंत्र) पोहोचले. त्यांनी मतदानयंत्राचे बटण दाबले आणि याचवेळी त्यांना तीव्र हृदयविकाराचा झटका आला. त्यामुळे ते जागीच कोसळले. मतदान केंद्रावर कर्तव्यास असलेल्या कर्मचार्‍यांना हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी संबंधित व्यक्तीस जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच धायगुडे यांचे निधन झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले.

मृत धायगुडे हे मुंबई येथे सनदी लेखापाल (चार्टड अकौंटंट) होते. परंतू काही वर्षांपूर्वीच ते आपल्या मूळ गावी म्हणजेच मोरवे, ता. खंडाळा येथे स्थायिक झाले होते. मतदानाचा पवित्र हक्क बजावण्यासाठी निवडणूक आयोग आवाहन करीत असते. शहरातील उच्चभ्रू व उच्चविद्याविभूषित लोकही मतदानादिवशी मतदानाकडे पाठ फिरवून पर्यटनास निघून जातात. परंतू व्यवसायाने सनदी लेखापाल असलेले व गावाकडे येवून शेती करीत आपले निवृत्तीनंतरचे आयुष्य जगत असलेल्या धायगुडेंना मतदानाचा हक्क बजावतानाच त्यांचा मृत्यू झाल्याने अनेकांनी हळहळ व्यक्त केली. शेवटी मतदान करतानाच मृत्यू आल्याने, याचसाठी केला होता अट्टाहास, शेवटचा दीस गोड व्हावा... या अभंगाचा यानिमित्ताने अनेकांना प्रत्यय आला.




लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
जिल्ह्यात मतदानासाठी येणार्‍या चाकरमान्यांची वाहतूक कोंडी
पुढील बातमी
विषारी हवा, प्रदूषणामुळे दिल्लीत परिस्थिती गंभीर

संबंधित बातम्या