पुणे : इंडिगो एअरलाइन्सची विमानसेवा सलग तिसऱ्या दिवशी विस्कळीत झाली असून, शुक्रवारी (दि. ५) पुण्यातून उड्डाण करणारी आणि येणारी एकूण ४२ विमाने रद्द झाली. परिणामी, दिल्ली, कोलकता, बंगळुरूसह इतर शहरात जाणाऱ्या प्रवाशांचे नियोजन कोलमडले आणि त्यांना मन:स्ताप सहन करावा लागला. काही प्रवाशांना तासंतास विमानतळावर ताटकळत थांबावे लागले, त्यामुळे विमानतळावर प्रवाशांची गर्दी झाली होती. तर, इंडिगोच्या ढिसाळ कारभारावर प्रवाशांनी ताशेरे ओढले.
डीजीसीएकडून विमान कर्मचाऱ्यांच्या वेळेत केलेल्या बदलामुळे गेल्या पाच ते सहा दिवसांपासून विमानांच्या वेळापत्रकात मोठा व्यत्यय निर्माण झाला आहे. त्याचा सर्वात मोठा फटका इंडिगोच्या उड्डाणांवर झाला आहे. त्यामुळे विमानांना विलंब आणि रद्द होण्याच्या घटनांमुळे प्रवाशांना गैरसोयींचे झाले आहे. शुक्रवारीही नागपूर, चेन्नई, दिल्ली, अमृतसर, अहमदाबाद, कोलकत्ता आणि रांची आदी ठिकाणची विमान सेवा रद्द करण्यात आली तर काहींना तीन ते चार तास उशीराने उड्डाण केले.