सातारा जिल्ह्यात घरगुती गॅसचा पुरेसा साठा उपलब्ध - जिल्हा पुरवठा अधिकारी वैशाली राजमाने, साठेबाजी, काळाबाजार करणाऱ्यांची माहिती नियंत्रण कक्षाला कळवा

by Team Satara Today | published on : 18 March 2026


सातारा  :  घरगुती गॅस पुरवठ्यावर केंद्र व राज्य शासनाचे लक्ष असून सातारा जिल्ह्यासाठी घरगुती गॅस सिलेंडर पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहे. गॅस एजन्सीकडून घरपोच गॅस सिलेंडर देण्यात येत आहे. तरी नागरिकांनी गॅस एजन्सीच्या बाहेर रांगा लावू नयेत. तसेच  कोणत्याही अफवावर विश्वास ठेवू नये, तसेच त्याचबरोबर गॅस वितरणास अडथळा आणू नये, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी वैशाली राजमाने यांनी केले आहे. 

जागतिक ग्राहक दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास जिल्हा ग्राहक तक्रार निवारण अयोगाचे अध्यक्ष पी.व्ही. गिरी गोस्वामी,   जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या सदस्या मनिषा रेपे, रोहीणी जाधव, सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी भारतकुमार तुंबडे, पुरवठा निरीक्षक अधिकारी बालाजी जाधव , ग्राहक संरक्षण परिषदेचे अशासकीय सदस्य आणि विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

युद्धजन्य परिस्थितीमध्ये घरगुती गॅस सिलेंडर मिळणार नाही अशा अफवा पसरविल्या जात आहेत, असे सांगून जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीमती राजमाने म्हणाल्या, घरगुती वापरासाठी गॅस सिलेंडर पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहेत. पूर्वी 22 हजार सिलेंडर लागत होते, पण आता लोकांनी पॅनिक क्रिएट केल्यामुळे आता नोंदणी सव्वा   लाखांवर गेली आहे,  हे केवळ भितीतून होत आहे. घरगुती गॅसची नोंदणी शहरी भागासाठी 26 व ग्रामीण भागासाठी 45 दिवसांची करण्यात आली आहे. गॅस वितरण कंपनीन्यांच्या वितरणावर चोख लक्ष देण्यात येत आहे. रोज त्यांच्याकडून वितरणाचा अहवाल घेतला जाता आहे. 

घरगुती गॅस हा वाणिज्यिक कारणांसाठी वापरु नये. शैक्षणिक संस्था, आश्रम शाळा, रुग्णालयांना पुरेशा प्रमाणात वाणिज्यक  गॅस सिलेंडर वितरीत करण्यात येत आहेत. कोणी घरगुती गॅसचा वापर वाणिज्यिक कारणांसाठी करीत असल्यास जिल्हा पुरवठा विभाग व तालुकास्तरीय पुरवठा विभागाला त्वरीत कळवावे, असे आवाहनही जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीमती राजमाने यांनी केले.

जिल्हा ग्राहक तक्रार निवारण अयोगाचे अध्यक्ष पी.व्ही. गिरी गोस्वामी म्हणाले, बदलत्या काळानुसार बाजारपेठेत ग्राहकांची फसवणूक होण्याचे प्रकार वाढत आहेत. अशा वेळी ग्राहकांनी केवळ वस्तू खरेदी करून समाधान न मानता, आपल्या हक्कांप्रति जागरूक राहणे गरजेचे आहे. ग्राहकांना केंद्रस्थानी ठेवूनच कायदे बनवण्यात आले आहेत. यामध्ये सुरक्षा, निवड, ग्राहकाला ज्ञान मिळणे व नुकसान भरपाई असे अधिकार देण्यात आले आहेत. याचा ग्राहकांनी वापर करावा. कोणत्याही वस्तूची खरेदी करताना त्याचे बिल घेणे, एक्सपायरी डेट तपासणे आणि जाहिरातींमधील अमिषांना बळी न पडणे ही ग्राहकांची प्राथमिक जबाबदारी आहे. फसवणूक झाल्यास ग्राहकांनी घाबरून न जाता ग्राहक मंचाकडे दाद मागावी. सध्या सायबर फसवणुकीचे प्रकार वाढले आहे याबाबतही नागरिकांनी जागृत रहावे, असे  जिल्हा ग्राहक तक्रार निवारण अयोगाचे अध्यक्ष पी.व्ही. गिरी गोस्वामी यांनी सांगितले.

जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या सदस्या मनिषा रेपे म्हणाल्या, उत्पादनकांनी माल बाजार विक्रीचा उद्देश न ठेवता सुरक्षितता देणेही महत्वाचे आहे. ग्राहकांनीही वस्तु खरेदीच्या अटी  व वॉरंटी तपासावी. तसेच  वस्तु खरेदीची पावती घ्यावी फसवणूक झाल्यास तक्रार करावी निश्चित न्याय मिळेल असेही त्यांनी सांगितले.

 जागतिक ग्राहक दिनानिमित्त घेण्यात आलेल्या प्रश्न मंजुषा स्पर्धे विजेत्या विद्यार्थ्यांचा सत्कारही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी भारतकुमार तुंबडे यांनी केले.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
खरात प्रकरणी रूपाली चाकणकर यांच्या अडचणीत वाढ; सुषमा अंधारेंनी 'तो' जुना पुरावा काढला बाहेर
पुढील बातमी
जल प्रवासी वाहतुकीसाठी वॉटर मेट्रो प्रकल्प तीन टप्प्यात कार्यान्वित करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; जल प्रवासी वाहतुकीला गती

संबंधित बातम्या