कंत्राटी पद्धत रद्द करून एक लाख सफाई कर्मचाऱ्यांची भरती करा - अखिल भारतीय सफाई मजदूर युनियनचे राष्ट्रीय अध्यक्षचरणसिंग टाक यांची मागणी

by Team Satara Today | published on : 21 February 2026


सातारा : राज्यातील सफाई कामगारांचे अनेक प्रश्न प्रलंबित असून त्यामध्ये कंत्राटी पद्धतीचा प्रश्न अत्यंत गंभीर असल्याचे मत अखिल भारतीय सफाई मजदूर युनियनचे राष्ट्रीय अध्यक्ष चरणसिंग टाक यांनी व्यक्त केले. कंत्राटी पद्धत पूर्णतः बंद करून राज्यात एक लाख सफाई कर्मचाऱ्यांची कायमस्वरूपी भरती करावी, अशी ठाम मागणी त्यांनी केली.

अखिल भारतीय सफाई मजदूर युनियनची बैठक साताऱ्यातील सर्किट हाऊस येथे जिल्हाध्यक्ष बबलू सोळंकी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी ते बोलत होते. या बैठकीस प्रदेशाध्यक्ष बाली मंडपू, प्रदेश कार्याध्यक्ष अशोक मारोडा, प्रदेश महामंत्री राहुल टाक, विभाग अध्यक्ष राजीव मारोडा यांच्यासह मोठ्या संख्येने सफाई कर्मचारी उपस्थित होते.

टाक यांनी सांगितले की, लाड समितीच्या शासकीय जीआरमध्येही सफाई कर्मचाऱ्यांसाठी कंत्राटी पद्धत रद्द करण्याचा उल्लेख आहे. तसेच सफाईच्या कामात कंत्राटी पद्धत लागू करू नये, असे स्पष्ट निर्देश असतानाही मोठ्या प्रमाणात कंत्राटी भरती केली जात आहे. या कर्मचाऱ्यांना किमान वेतनदेखील दिले जात नसल्याने त्यांच्यावर अन्याय होत असल्याचा आरोप त्यांनी केला.

राज्यातील शासकीय व निमशासकीय जागांवर राहत असलेल्या सफाई मजदूरांना त्या जागेवर कायमस्वरूपी राहण्याचा अधिकार द्यावा तसेच त्यांना मोफत घरे उपलब्ध करून देण्यासाठी निधी उपलब्ध करावा, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. या मागण्यांसाठी येत्या २७ तारखेला राज्यस्तरीय अधिवेशन आयोजित करण्यात आले असून, त्यासाठी मुख्यमंत्र्यांना निमंत्रित करण्यात आले आहे. तसेच मुंबईतील सफाई कामगारांचा मेळावा घेऊन या सर्व मागण्या महाराष्ट्र शासन यांच्याकडे मांडण्यात येणार असल्याचेही टाक यांनी सांगितले.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सातारा पालिकेच्या पर्यावरण कामगिरीचा मुंबईत गौरव; माजी वसुंधरा अभियानाचे सहा कोटी प्राप्त :पालिका प्रशासन व पदाधिकारी सन्मानित
पुढील बातमी
बालरंगभूमी परिषदेच्या अध्यक्षपदी रसिका केसकर व कार्याध्यक्षपदी रेश्मा वाळिंबे यांची निवड

संबंधित बातम्या