कोरेगावमध्ये लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचा पूर्णाकृती पुतळा उभारणार; आमदार महेश शिंदे यांची ग्वाही

by Team Satara Today | published on : 24 December 2025


कोरेगाव : विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश शिंदे यांना साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पूर्णाकृती पुतळा कोरेगाव शहरात उभारण्यात यावा, या मागणीचे निवेदन खटाव येथील निवासस्थानी देण्यात आले. या निवेदनाच्या अनुषंगाने आमदार शिंदे यांनी लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळा उभारणीसाठी शंभर टक्के प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही दिली.

निवेदन देण्यासाठी सुरेश बोतालजी आणि गोरख बोतालजी उपस्थित होते. यावेळी आमदार महेश शिंदे म्हणाले, आजअखेर अण्णा भाऊ साठे यांच्या नावाने कोणताही अधिकृत प्रस्ताव माझ्याकडे आलेला नव्हता. त्यामुळे हा विषय आता प्रथमच प्रत्यक्ष कामाच्या पातळीवर आला आहे. मात्र, यापुढे अण्णा भाऊ साठे यांचा पुतळा उभारण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न १०० टक्के केले जातील.

ते पुढे म्हणाले की, कोरेगाव शहरात अण्णाभाऊ साठे यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात येईल. यासाठी योग्य त्या जागेची पाहणी केली जाईल आणि सर्व संबंधित शासकीय प्रक्रिया पूर्ण करून लवकरात लवकर पुतळा उभारण्यात येईल, असे स्पष्ट आश्वासन त्यांनी दिले.

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे हे शोषित, वंचित आणि कष्टकरी समाजाचा बुलंद आवाज होते. त्यांच्या विचारांचा आणि सामाजिक योगदानाचा सन्मान म्हणून कोरेगाव शहरात त्यांच्या पुतळा उभारण्याची मागणी अनेक वर्षांपासून समाजबांधवांकडून होत होती. नगरपंचायतीने यासंदर्भात ठराव मंजूर केल्यानंतर आता आमदार महेश शिंदे यांच्या माध्यमातून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याने समाजात समाधान व्यक्त केले जात आहे.

आमदार महेश शिंदे यांच्या या आश्वासनामुळे अण्णा भाऊ साठे प्रेमी, मातंग समाज तसेच सर्व समाजबांधवांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, लवकरच कोरेगाव शहरात अण्णाभाऊ साठे यांचे स्मारक उभे राहील, अशी आशा व्यक्त केली जात आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
श्रीपतराव पाटील हायस्कूलमध्ये "आनंददायी शनिवार" उत्साहात साजरा
पुढील बातमी
काळूबाईदेवीची यात्रा सुरक्षित वातावरणात पार पाडा, कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची दक्षता घ्यावी - जिल्हाधिकारी संतोष पाटील

संबंधित बातम्या