सातारा : जावलीच्या दऱ्याखोऱ्यातील इतिहासाचा मूक साक्षीदार, स्थापत्यशास्त्राचा अजोड नमुना आणि तब्बल १५० वर्षांहून अधिक काळ वेण्णा नदीच्या लाटा छातीवर झेलणारा आंबेघर येथील ब्रिटिशकालीन पूल अखेर 'इतिहासजमा' झाला आहे. मकर संक्रांतीच्या शुभमुहूर्तावर या पुलाला निरोप देण्यात आला. जुना वारसा काळाच्या पडद्याआड गेला असला, तरी आता त्या जागी ८ कोटींच्या नवीन पुलाचे स्वप्न आकाराला येत आहे. पण तत्पूर्वी पावसाळ्यापूर्वी हा पूल पूर्ण क्षमतेने उभा करा अशी मागणी जावली तालुक्यातील लोकांनी केली आहे.
हा केवळ दगड-धोंड्यांचा पूल नव्हता, तर तो ब्रिटिशांच्या 'आर्च' पद्धतीचा एक चमत्कार होता. कोरीव दगड आणि चुन्याच्या जोरावर उभा असलेला हा पूल आजही तितकाच मजबूत होता. ज्येष्ठ जाणकार सांगतात की, जुलै २०२१ च्या महाप्रलयकारी पुरामध्ये या पुलावरून ५ फूट पाणी वाहत होते, पण या पुलाला साधी चिरा ही गेली नाही. दीडशे वर्ष उलटूनही याची मजबुती पाहून आधुनिक अभियंते थक्क होत होते.
विटा-महाबळेश्वर या मुख्य राज्यमार्गाच्या कामात ठेकेदाराच्या दिरंगाईमुळे हा पूल आणि केळघरचा रस्ता प्रलंबित होता. मात्र, स्थानिक जनतेची मागणी आणि वाहतुकीची गरज ओळखून तत्कलीन आमदार तथा सध्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी विशेष पाठपुरावा केला होता. त्यांच्या प्रयत्नातून या पुलासाठी ८ कोटी रुपयांचा स्वतंत्र निधी मंजूर झाला होता, त्यामुळे आता प्रत्यक्ष कामाला वेग आला आहे.
पुलाच्या एका बाजूला असलेले प्रसिद्ध रामजीबुवा मंदिर आणि हा पूल म्हणजे प्रवाशांचे हक्काचे विसाव्याचे ठिकाण. साताऱ्याहून महाबळेश्वरला जाणारे पर्यटक असोत किंवा स्थानिक ग्रामस्थ, या पुलावर क्षणभर थांबल्याशिवाय कोणाचाही प्रवास पूर्ण होत नव्हता. परवा हा पूल पाडताना परिसरातील नागरिकांच्या मनात जुन्या आठवणी तरळून गेल्या.
पुलाचे बांधकाम आता युद्धपातळीवर सुरू झाले आहे. मात्र, जावलीत पावसाचा जोर प्रचंड असतो. त्यामुळे येणाऱ्या पावसाळ्यापूर्वी हा पूल पूर्ण क्षमतेने उभा राहावा, अशी कळकळीची मागणी आंबेघर, केळघर आणि मेढा परिसरातील ग्रामस्थांकडून केली जात आहे.