सातारा : सातारा शहरात बेकायदेशीरपणे मॉडीफाय केलेल्या दुचाकी वाहनांवर वाहतूक पोलिसांनी कडक कारवाई सुरू केली असून मंगळवारी सकाळपासून राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेत तब्बल १८ दुचाकी वाहने जप्त करण्यात आली आहेत. रात्री १० वाजेपर्यंत ही कारवाई सुरू होती.
यामध्ये सायलेन्सरमध्ये बदल करणे, कर्णकर्कश हॉर्नचा वापर, वाहनांचा रंग बदलणे तसेच नियमबाह्य अॅक्सेसरीज बसविणे अशा प्रकारच्या दुचाकींवर ही कारवाई करण्यात आली. शहरातील मोती चौक, राजवाडा, पोवई नाका, कमानी हौद या प्रमुख चौकांमध्ये वाहतूक पोलिसांनी नाकाबंदी करून वाहनांची कसून तपासणी केली.या कारवाईत रॅश ड्रायव्हिंग करणाऱ्या युवकांवरही दंडात्मक कारवाई करण्यात आली असून, नियम मोडणाऱ्यांना चांगलाच दणका देण्यात आला आहे. काही युवक दुचाकीवरून भरधाव वेगाने, मोठ्या आवाजात हॉर्न व सायलेन्सर वाजवत नागरिकांना त्रास देत असल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर ही मोहीम हाती घेण्यात आली. सहायक पोलीस निरीक्षक अभिजीत यादव यांच्या मार्गदर्शनाखाली शहर वाहतूक शाखेने ही विशेष मोहीम राबवली.