सातारा : विश्व काव्य दिनानिमित्त शनिवार, दि. 21 रोजी सायंकाळी 6.30 वाजता गोडोली येथील आयुर्वेदिक गार्डनमध्ये ‘गझल संध्या’ या गझल गायनाच्या मैफिलीचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती कार्यक्रमाचे संयोजक राहूल कीर्तीकर यांनी दिली.
या कार्यक्रमात गझल, शायरी व सुरेल गीतांचा अविष्कार सादर होणार आहे. गीतकार, संगीतकार राजकुमार साळवे व पार्श्वगायिका शाकंभरी कीर्तीकर हे गझलांचा नजराणा पेश करणार असून या मैफिलीचे खास निवेदन श्याम ढोके करणार आहे. या कार्यक्रमासाठी उपनगराध्यक्ष अॅड. डी. जी. बनकर, गजलकार, कवी व उद्योजक वसंत शिंदे यांचे विशेष सहकार्य लाभले असून काव्य दिनानिमित्त रसिकांसाठी ही खास पर्वणी उपलब्ध झाली आहे.
यावेळी विविध मान्यवरांची उपस्थिती लाभली असून या गझल मैफिलीचा रसिकांनी आस्वाद घ्यावा, असे आवाहन राहूल कीर्तीकर, उद्योजक शिवाजी कदम, चंद्रकांत देवरुखकर यांनी केले आहे.