महाबळेश्वर : येथील वेण्णा लेक परिसरात असणाऱ्या काळे वस्तीजवळच्या झुडपांमध्ये सुमारे सात ते आठ फूट लांबीचा अजगर आढळला. त्याला महाबळेश्वर वन विभाग व सह्याद्री प्रोटेक्टर्समार्फत रेस्क्यू करण्यात आले. त्यानंतर त्याला मानवी वस्तीपासून दूर नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.
येथील काळे वस्तीनजीकच्या झुडपांमध्ये अजगर असल्याचे वनमजूर संतोष काळे यांच्या निदर्शनास आले. याठिकाणी असलेल्या मानवी वस्तीमध्ये पाळीव कोंबड्या, श्वान आहेत. त्याच भक्ष्याच्या शोधात अजगर याठिकाणी आला असावा, असा अंदाज वन विभागाने व्यक्त केला आहे. वनमजूर संतोष काळे यांनी ही बाब वनपाल सुनील लांडगे व सह्याद्री प्रोटेक्टर्सच्या सदस्यांना कळवली.
घटनास्थळी पोहोचल्यानंतर मानवी वस्तीशेजारी आलेल्या अजगराला रेस्क्यू करून दूर नेणे आवश्यक असल्याने वनक्षेत्रपाल महादेव मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली वन विभाग व सह्याद्री प्रोटेक्टर्स टीममार्फत अजगराला रेस्क्यू करून सुखरूप नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. या आधीही प्रतापगड भागात बऱ्याचदा अजगर आढळले असून, महाबळेश्वर शहरानजीक प्रथमच तो आढळला आहे.
यावेळी वनपाल सुनील लांडगे, वनमजूर संतोष काळे, नीलेश सपकाळ, सह्याद्री प्रोटेक्टर्सचे देवेंद्र परदेशी, हर्ष साळुंखे व सचिन गुजर आदींनी रेस्क्यू कार्यात सहभाग घेतला.