सातारा : सातारा शहर बसस्थानकासमोर ट्रिपल-सीट बुलेट चालवणाऱ्या युवकाने बेदरकारपणे भरधाव वेगात दुचाकी चालवत एका प्रवाशाला जोरदार धडक दिली आहे. या धडकेत मनिरुल अब्दुल रज्जक इस्लाम (वय ३०, रा. देहूरोड, पुणे) गंभीर जखमी झाले असून त्यांच्या डोक्याला आणि चेहऱ्यावर मार लागला आहे. याबाबतच्या अपघाताची नोंद शाहूपुरी पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.
धडक देणारा बुलेट चालक अर्नव मिलिंद कुलकर्णी (रा. निमसोड, ता. खटाव) देखील जखमी झाला. प्रत्यक्षदर्शींनुसार आरोपी युवक ट्रिपल सीट बुलेट मोठ्या वेगाने चालवत होता. अचानक नियंत्रण सुटून त्याने समोरून येणाऱ्या पादचाऱ्याला धडक दिली. घटनेनंतर शाहूपुरी पोलिसांनी तक्रार नोंदवून आरोपी दुचाकी चालकावर गुन्हा दाखल केला.