सातारा : सातारा तालुक्याचे भाग्यविधाते, माजी सहकारमंत्री स्व. श्रीमंत छ. अभयसिंहराजे भोसले उर्फ भाऊसाहेब महाराज यांची शुक्रवार दि. १६ मे रोजी ८१ वी जयंती असून यानिमित्त अभिवादन कर्यक्रम तसेच विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत.
शुक्रवारी शेंद्रे ता. सातारा येथील अजिंक्यतारा सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावरील स्व. भाऊसाहेब महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन करण्यात येणार आहे. यावेळी ना. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यासह सातारा आणि जावली तालुक्यातील विविध मान्यवर, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि भाऊसाहेब महाराजप्रेमी उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर वळसे ता. सातारा येथील एहसास मतिमंद मुलांच्या शाळेत मिष्टान्न वाटप केले जाणार आहे. सातारा येथील क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा सर्वसाधारण रुग्णालय येथे कर्तव्य सोशल ग्रुप, सायन रुग्णालय आणि जिल्हा रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने ० ते १४ वयोगटातील १०४ बालकांवर विविध असाध्य आजारावरील मोफत शस्त्रक्रिया शिबीर होणार आहे. दरम्यान, दि. १६ रोजी जयंतीनिमित्त विविध ठिकाणी आरोग्य शिबीर, रक्तदान शिबीर तसेच तालुक्यातील विविध स्थानिक स्वराज्य संस्था, सहकारी संस्थांमध्ये स्व. भाऊसाहेब महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात येणार आहे.