सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट एमआयडीसीमधील एका टॉवेल बनवणाऱ्या कारखान्याला रविवारी भीषण आग लागली होती. या घटनेत 9 महिला आणि एका मुलासह 8 जणांचा मृत्यू झाला आहे. अक्कलकोट रोडवरील सेंट्रल टेक्सटाईल मिल्समध्ये पहाटे ही आग लागली होती. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शोक व्यक्त करत मृतांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत जाहीर केली आहे.
सोलापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतांमध्ये कारखान्याचे मालक हाजी उस्मान हसनभाई मन्सूरी, त्यांच्या दीड वर्षाच्या नातवासह कुटुंबातील तीन सदस्य आणि चार कामगारांचा समावेश आहे. मृतांमध्ये तीन महिलांचाही समावेश आहे. ही आग इतकी भीषण होती की अग्निशमन दलाच्या जवानांना आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी पाच ते सहा तास लागले.
पहाटेच्या सुमारास टॉवेल कारखान्यातून धूर येऊ लागल्यानंतर परिसरातील काही लोकांनी 108 वर फोन करून आगीची माहिती दिली. आग लागल्याची माहिती मिळताच पोलीस प्रशासन, महसूल प्रशासन आणि अग्निशमन दलाच्या गाड्या सकाळपासूनच परिसरातील आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत होते. मात्र ही आग इतकी भीषण होती की, टॉवेल कारखाना पूर्णपणे खाक झाला आहे. यामुळे मोठी वित्तहाणी झाली आहे. या आगीच्या घटनेत कारखान्याचे मालक उस्मान हाशम मन्सुरी, अनस मन्सुरी, शिफा मन्सुरी, युसुफ मन्सुरी, मेहताब बागवान, आयेशाबानो बागवान, सलमान बागवान, हिना शेख हे मृत्यूमुखी पडले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदींना या घटनेबाबत ट्वीट करत म्हटले की, 'सोलापूर इथे आग लागून झालेल्या दुर्घटनेतील जीवितहानीमुळे तीव्र दु:ख झाले. आपले प्रियजन गमावलेल्या कुटुंबांप्रति माझ्या सहवेदना. जखमी झालेले लवकर बरे होवोत ही प्रार्थना. पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीमधून (PMNRF) प्रत्येक मृतांच्या वारसाला 2 लाख रुपयांची मदत दिली जाईल. जखमींना 50,000 रुपये दिले जातील'
या घटनेनंतर ट्वीट करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की, "सोलापूरमध्ये अक्कलकोट मार्गावर एका टेक्सटाईल युनिटला लागलेल्या आगीत 8 जणांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुःखद आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत. मृतांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहायता निधीतून 5 लाख रुपयांचे अर्थसहाय्य देण्यात येईल."