पाचगणी : पाचगणीजवळील खिंगर (ता. महाबळेश्वर) येथील ‘वर्षा व्हिला’ या बंगल्यात ‘गायिका’ आणि ‘महिला वेटर’च्या नावाखाली बारबालांना आणून, संगीताच्या तालावर उत्तान कपड्यांमध्ये, अश्लील हावभाव करून नृत्य केले जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पाचगणी पोलिसांनी या बंगल्यावर छापा टाकून हॉटेल मालकासह सहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत 18 लाख 80 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याने, खळबळ उडाली आहे.
पाचगणीत होणार्या गैरप्रकारांवर कडक कारवाईचे निर्देश पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर आणि वाईचे पोलीस उपअधीक्षक सुनील साळुंखे यांनी दिले होते. त्यानुसार पाचगणीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांच्या नेतृत्वाखालील पथकाने खिंगर येथील ‘वर्षा व्हिला’ या बंगल्यावर सोमवारी (दि. 3) मध्यरात्री 1.15 च्या सुमारास छापा टाकून, पाच जणांना ताब्यात घेतले.
पोलीस पथकाने बंगल्याच्या मुख्य हॉलची तपासणी केली असता, हॉटेलमालकाने आणलेल्या सहा बारबाला उत्तान कपड्यांमध्ये पाच ते सात ग्राहकांसमोर अश्लील हावभाव करत, नृत्य करताना दिसल्या. बारबाला ग्राहकांशी लगट करत होत्या, तर ग्राहक त्यांच्यावर नोटा उधळत होते. पोलिसांनी घटनास्थळावरून साऊंड सिस्टीम, लाइट सिस्टीम, मोबाइल, डीव्हीआर आणि एक कार असा मुद्देमाल जप्त केला आहे. सपोनि दिलीप पवार, सहाय्यक फौजदार कैलासनाथ रसाळ, हवालदार श्रीकांत कांबळे, विठ्ठल धायगुडे, उमेश लोखंडे, व्ही. यू. नेवसे, श्रुती गोळे यांनी ही कारवाई केली. सपोनि पवार तपास करत आहेत.