सातारा : कृष्णानगर, ता. सातारा परिसरामध्ये काही अपप्रवृत्तीचे लोक रस्ता आमच्या हक्काचा.. नाही कोणाच्या बापाचा....! असे म्हणत रस्त्याकडेला मोठ्या प्रमाणावर कचरा टाकत आहेत. विशेष म्हणजे घंटागाडीची व्यवस्था असतानाही तसेच येथे कचरा टाकू नये असे फलक लावलेले असतानाही, असे प्रकार सर्रास घडत असल्यामुळे खेड ग्रामपंचायत प्रशासनाने अक्षरशः हात टेकले आहेत. थोडक्यात कृष्णनगर येथील महावितरण कार्यालय परिसर अस्वच्छतेचे आगार होऊ पाहत आहे.
कृष्णानगर येथे जिल्ह्याचे महावितरण मुख्य कार्यालय, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे मुख्य अशी दोन प्रशासकीय महत्त्वाची कार्यालये कार्यरत आहेत. याच परिसरामध्ये दोनपेक्षा अधिक मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल्स असून दररोज सकाळी आणि संध्याकाळी या ठिकाणी भाजी मार्केटमध्ये भाजी खरेदी करण्यासाठी अनेकजण गर्दी करत असतात. कृष्णा खोरे विकास महामंडळ कार्यालयानजीक छत्रपती संभाजी महाराज तथा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासह त्यामध्ये काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांसह शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थी- विद्यार्थिनींसाठी हॉस्टेलची उभारणीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. थोडक्यात कृष्णानगर भागाला अलीकडच्या काळात अनन्य साधारण महत्व प्राप्त होऊ लागले. कृष्णानगर, वनवासवाडी ही लोकवस्ती खेड ग्रामपंचायतीच्या अंतर्गत येते. कृष्णानगरला लागूनच विकासनगर, सत्यमनगर, गोकर्ण कॉलनी अशा मोठ्या वसाहती आहेत. याही ठिकाणी रविवार वगळता दररोज कचरा उचलण्यासाठी घंटागाडीची व्यवस्था करण्यात आली आहे.
दरम्यान, गेल्या काही वर्षांमध्ये सोलापूर- सातारा महामार्गावर कृष्णानगर येथील महावितरचे मुख्य कार्यालय आणि शनि मारुती मंदिर परिसरामध्ये रस्त्याकडेला असणाऱ्या मोकळ्या जागेत काही अपप्रवृत्तीचे लोक मोठ्या प्रमाणावर प्लास्टिकचे पोते, प्लास्टिकच्या मोठ्या पिशव्यांमध्ये कचरा भरून तो दुचाकीवरून आणून टाकत आहेत. त्यामुळे त्या परिसरात भटक्या श्वानांची संख्या फार मोठ्या प्रमाणावर वाढली असून, भटके श्वान कचऱ्यामध्ये काही खायला मिळते का? याचा शोध घेत असल्यामुळे कचरा अगदी रस्त्याकडेला तर बऱ्याचदा रस्त्यावर येत आहे. यावर्षी मे महिन्यापासून मोठ्या प्रमाणावर पाऊस पडुन कचरा भिजल्यामुळे त्या ठिकाणी दुर्गंधीचे साम्राज्य निर्माण झाले होते.
कचरा रस्त्याकडेला न टाकता तो घंटागाडीतच टाकावा असे आवाहन करत खेड ग्रामपंचायतीच्या आरोग्य विभागाचे कर्मचारी अनेकदा तो कचरा ट्रॅक्टरमध्ये भरून घनकचरा प्रकल्पामध्ये घेऊन जातात. काही अपप्रवृत्तीचे लोक सातत्याने आवाहन करूनही त्या ठिकाणी कचरा टाकत असल्यामुळे खेड ग्रामपंचायतीच्या माध्यमातून येथे कचरा टाकू नये...... अशा आशयाचे फलकही त्या ठिकाणी वारंवार लावण्यात येत आहेत. मात्र तरीही कचऱ्याचे प्रमाण कमी न होता ते वाढतच चालल्यामुळे खेड ग्रामपंचायतच्या पदाधिकाऱ्यांसह प्रशासनात काम करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांवर हात टेकण्याची वेळ आली आहे.
दंडात्मक कारवाईची गरज...
वारंवार फलकाच्या माध्यमातून आवाहन करूनही संबंधित ठिकाणी मोठ्या प्रमाणावर दुचाकी अथवा चार चाकीमधुन कचरा आणून टाकला जात असल्यामुळे सकाळी या मार्गावरून मॉर्निंग वॉकसाठी जाणाऱ्या नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. अक्षरशः नाकाला रुमाल बांधूनच परिसरातून ये-जा करावी लागत आहे. सूचना करूनही कोणताच फरक पडत असल्यामुळे संबंधित ठिकाणी कचरा टाकणाऱ्या अपप्रवृत्तीच्या लोकांवर दंडात्मक कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे.