सातारा : आम्ही जनतेसाठी २४ तास उपलब्ध असतो. सातारकर नागरिकांचे सर्वप्रकारचे प्रश्न सोडवण्यासाठी खासदार उदयनराजे आणि मी, दोघेही नेहमीच प्राधान्य देतो. निवडणूक ही केवळ एक प्रक्रिया आहे. सातारकर नेहमीच आमच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिले आहेत, त्यामुळे सातारकर भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांसह सर्व उमेदवारांना विजयी करतील यात तिळमात्र शंका नाही, असे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले.
ना. शिवेंद्रसिंहराजेंच्या उपस्थितीत प्रभाग क्र. ७ मध्ये भाजपचे नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार अमोल मोहिते, प्रभागातील नगरसेवक पदाचे अधिकृत उमेदवार सौ.वनिता शिंदे आणि मनोज शेंडे यांच्या प्रचारार्थ काढण्यात आलेल्या पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सकाळी ८.३० वाजता पोलीस मुख्यालय पासून पदयात्रेला सुरुवात झाली. पदयात्रा ढोर गल्ली - तेली खड्डा - बारटक्के चौक- बुधवार नाका- बाबर कॉलनी, बेबले वकील घर- बुधवार नाका, बाबर कॉलनी, श्रीपतराव शाळा, आंदेकर चौक या मार्गावरून काढण्यात आली. पदयात्रेत सर्व आजी माजी पदाधिकारी, सर्व आजी माजी नगरसेवक, असंख्य कार्यकर्ते आणि नागरिक सहभागी झाले. ठिकठिकाणी नागरिकांनी ना. शिवेंद्रसिंहराजे आणि उमेदवारांचे उत्स्फूर्त स्वागत केले.
सातारा शहराचा विकास करणे आणि नागरिकांचे सर्व प्रकारचे प्रश्न सोडवणे यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. सातारा शहरात अनेक विकासकामे मार्गी लावली आहेत आणि नागरिकांच्या दृष्टीने महत्वाची सर्वप्रकारची कामे केली आहेत. अनेक विकासकामे सुरु आहेत. खड्डेमुक्त रस्ते करण्यासाठी काँक्रीटीकरण करण्याला प्राधान्य दिले जात आहे. विरोधकांकडे सांगण्यासारखे काहीही नाही त्यामुळे ते जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्या भूलथापांना सुज्ञ सातारकर कधीही भुलणार नाहीत. सातारकर या निवडणुकीत उच्चांकी मतदान करून नगराध्यक्षपदासह भाजपच्या सर्व उमेदवारांना विक्रमी मतांनी विजयी करतील, असे ना. शिवेंद्रसिंहराजे याप्रसंगी म्हणाले.