सातारा : वाई तालुक्यातील शेंदूरजणे येथे एका डवरी समाजातील कुटुंबातील चौघांना बेदम मारहाण करुनही त्यांच्यावर अद्याप कारवाई झालेली नाही. वाई पोलीस ठाण्याने त्या मारहाण करणार्यांना तातडीने अटक करावी, अशी मागणी पीडीत कुटुंबाने केली असून त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर बेमुदत धरणे आंदोलन सुरु केले आहे.
याबाबत जिल्हाधिकार्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शेंदुरजणे येथील डवरी समाजातील दिलीप बाबर, संगीता बाबर, अश्विनी बाबर, ज्योती बाबर, जितेंद्र बाबर यांना मारहाण करुन जखमी केले असताना आरोपी ओंकार पवार, शुभम पवार, मोन्या पवार, लक्ष्मण पवार यांना अजून ही अटक केली नाही. याच्या निषेधार्थ आपल्या कार्यालयासमोर आम्ही धरणे आंदोलन सुरु केले असून याची दखल घेवून मारहाण करणारांवर गुन्हे दाखल करुन पोलिसांनी गुंडांना अटक करावी. तसेच आमच्या कुटुंबाला संरक्षण द्यावे ही आमची मागणी आहे.
या आंदोलनात सुभाष गुंजाळ, आशिकी गुंजाळ, सविता कणसे, रुपिता पवार, रिना भोसले, सुनिल माने, दत्ता गुंजाळ व पीडीत कुटुंबातील दलीप बाबर, संगीता बाबर, अश्विनी बाबर, ज्योती बाबर सहभागी झाले आहेत.
दरम्यान, या कुटुंबाला न्याय देण्याबाबत प्रशासनाने तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी दलित महासंघाचे जिल्हाध्यक्ष उमेश चव्हाण यांनी केली आहे.