महाबळेश्वर : येथे वटवाघळाची एक दुर्मिळ प्रजाती आढळली असून, या प्रजातीस पेंटेड बॅट या नावाने ओळखले जाते. महाबळेश्वर शहरात राहणाऱ्या सरफराज शेख यांच्या घरात हे दुर्मिळ वटवाघूळ आढळले. हे वटवाघूळ व त्याचा रंग पाहता सरफराज यांनी हे वटवाघूळ बरणीच्या साहाय्याने पकडून त्यांनी ते वटवाघूळ येथील वन विभागाच्या कार्यालयामध्ये नेऊन दिले.
नारंगी रंग, पंखावरती काळे त्रिकोणी पट्टे, शरीराची लांबी तीन ते पाच सेमीपर्यंत असलेल्या या वटवाघळाला ३८ दात, तर ५० ग्रॅम वजन आढळले. या वटवाघळाचा वावर केळीची झाडे, गुहा, सुके वन, झोपड्यांच्या कोपऱ्यावरती अशा भागात आढळतो, तर छोटे किडे हे त्याचे प्रमुख अन्न आहे. या वटवाघळाची जोडी एकावेळी एकच पिल्लाचा सांभाळ करू शकते, ही वटवाघळे पाच ते सहाच्या समूहाने राहतात.
महाबळेश्वरचा बराचसा परिसर जंगलाने, दऱ्याखोऱ्याने व्यापला असून, बराच खडकाळ भाग देखील आहे. येथील तापोळा भाग तसेच महाबळेश्वर शहरानजीक असणाऱ्या खडकाळ भागातील गुहांमध्ये तसेच शहरी भागात देखील विविध वटवाघळांच्या प्रजाती पाहावयास मिळतात.
सरफराज याने पकडलेल्या या वटवाघळास वनपरिक्षेत्र अधिकारी गणेश महांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक लहू राऊत, वनरक्षक रमेश गडदे तसेच वनकर्मचारी यांनी येथील नैसर्गिक अधिवासात सोडून दिले.