कराड : सातारा जिल्ह्यातील कोयना धरणातुन आज मंगळवारी पहिल्यांदाच पाणी कोयना नदीत सोडण्यात आले. आज सकाळी कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे एक फूट सहा इंच उघडून तीन हजार ४०० क्युसेक पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात सोडण्यात आला आहे. कोयना धरण पायथा विद्युतगृहाचे दोन्ही युनिट सुरू असून त्याद्वारे २१०० क्युसेक्स विसर्ग सुरू आहे. कोयना नदीमध्ये एकूण पाच हजार ५०० क्युसेक विसर्ग सुरू करण्यात आला आहे.
कोयना धऱण परिसरात गेल्या दोन आठवड्यापासुन मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे कोयना धरणातील पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. आज सकाळी आठ वाजता कोयना धरणाची पाणी पातळी ७५.४८ टीएमसी झाली. तर कोयनानगरला १०३, नवजाला १३४ तर महाबळेश्वरला ९२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली.
आजचा पाणीसाठा, धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पाऊस, धरणामध्ये येणारी पाण्याची आवक आणि उर्वरित मान्सून कालावधी विचारात घेता कोयना जलाशय परिचलन सूचीनुसार धरणातील पाणीपातळी नियंत्रित ठेवण्यासाठी धरणातून पाणी सोडणे आवश्यक होते. कोयना धरणातील पाणी पातळी नियंत्रण करण्यासाठी आज सकाळी ११ वाजता धरणाचे सहा वक्र दरवाजे एक फुट सहा इंच उचलुन तीन हजार ४०० क्युसेक पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात सोडण्यात आला आहे.
कोयना धरण पायथा विद्युतगृहाचे दोन्ही युनिट सुरू असून त्याद्वारे २१०० क्युसेक्स विसर्ग सुरू आहे. कोयना नदीमध्ये एकूण पाच हजार ५०० क्युसेक विसर्ग सुरू करण्यात आला आहे. कोयना धऱणातुन नदीपात्रात पाणी सोडण्यात आल्याने नदीची पाणी पातळी वाढणार असल्याने कोयना नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडुन सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.