‘चायनीज मांजा’ गांजापेक्षा घातक; फलटणमध्ये महिनाभरात चारजण जखमी

व्यापार्‍यांची राजरोस विक्री, पोलिसांचे मात्र जाणीवपूर्वक दुर्लक्ष

by Team Satara Today | published on : 01 August 2023


सातारा : सध्या सणासुदीमुळे हवेत पतंग उडविण्यासाठी अनेक हौसे-गवशे-नवशे हातात पतंगाचा दोर घेवून आपली काटाकाटीची हौस भागवत आहेत. परंतू पतंग उडविण्यासाठी वापरला जाणारा धागा मात्र चायनीज मांजा असल्यामुळे फलटण तालुक्यात गेल्या महिनाभरामध्ये चार ते पाचजण गंभीर जखमी झाले आहेत. त्यामुळे चायनीज मांजा गांजापेक्षाही घातक असल्याने त्याच्यावर कायमस्वरुपी बंदी घालण्याची मागणी फलटण तालुक्यातून होवू लागली आहे.
काल दि. 31 जुलै रोजी फलटण मधील सोमवार पेठेतील बाह्यरस्त्यावरुन दुचाकीवरुन जात असलेल्या संतोष जगन्नाथ कोलवडकर रा. दालवडी, ता. फलटण यांना रस्त्यावर लोंबकळत असलेला चायनीज मांजा कापल्याने त्यांच्या हाताला तसेच चेहर्‍याला गंभीर जखमा झाल्या होत्या. या प्रकारामुळे पुन्हा एकदा चायनीज मांजाचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे.
सुमारे चार ते पाच वर्षापूर्वी लोणंद येथील एकजण आपल्या लहान मुलासमवेत फलटण येथे नातेवाईकांकडे आला होता. यावेळी पतंग उडविताना पतंग तुटल्याने चायनीज मांजाचा धागा त्या दुचाकीवरील इसमाला तसेच त्याच्या लहान मुलाला कापल्यामुळे ते दोघेजण गंभीर जखमी झाले होते. रुग्णालयात उपचार सुरु असताना संबंधिताचा दहा वर्षाचा मुलगा दगावला होता. चायनीज मांजाने कापल्यामुळे एका लहान मुलाचा मृत्यू झाल्यामुळे जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण राज्यभरात खळबळ उडाली होती. यानंतर पोलिसांनी चायनीज मांजा विक्री करणार्‍या व्यापार्‍यांवर कारवाई करुन त्यांच्याकडून विक्रीस ठेवलेला चायनीज मांजा ताब्यात घेतला होता. परंतू काही दिवस उलटताच पुन्हा ये रे माझ्या मागल्या प्रमाणे काही व्यापार्‍यांनी हाच मांजा पुन्हा विक्रीस ठेवायला सुरुवात केली. गेल्या काही दिवसांमध्ये विशेषत: फलटण शहर व तालुक्यामध्ये या चायनीज मांजाद्वारे पतंग उडविण्याचे काम सुरु आहे. यामध्ये चायनीज मांजाद्वारे पतंग उडविणे, यामध्ये जरी थ्रिल वाटत असले, आणि या थ्रिलमधून जर कोणाला आसुरी आनंद मिळत असेल तर अशांवर कडक कारवाई होणे गरजेचे आहे. या चायनीज मांजामुळे गेल्या काही वर्षांमध्ये अनेकजण जखमी झाले आहेत, तर एका निष्पाप बालकाला हाकनाक जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनाने जनाची नाही, तर मनाची लाज बाळगून चायनीज मांजा धाग्याची विक्री करणार्‍यांबरोबरच चायनीज मांजाद्वारे पतंग उडविणार्‍यांवरही कठोर कारवाई करावी, अशी मागणी होवू लागली आहे.

विकणार्‍यांपेक्षा उडविणार्‍यांच्या प्रबोधनाची गरज
चायनीज मांजाद्वारे पतंग उडविणे हा ट्रेंड अलिकडेच सुरु झालेला आहे. जिल्ह्यात विशेषत: फलटण तालुक्यात याचा जोर आहे. गेल्या चार-पाच वर्षांमध्ये या चायनीज मांजामुळे अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत, तर एका बालकाला आपला जीव गमवावा लागला आहे. असे असूनही काही लोक या चायनीज मांजाद्वारेच पतंग उडवित आहेत. त्यामुळे भविष्यातही एखादा गंभीर धोका यामुळे उद्भवू शकतो. दरवर्षी अपघात घडल्यानंतर यासंदर्भात प्रशासनाला निवेदनावर निवेदने दिली जातात. याचा परिपाक म्हणून तात्पुरती मलमपट्टी होते, नंतर पुन्हा तेच-तेच सुरु होते. चायनीज मांजाची मागणी जास्त असल्यानेच व्यापारीही चोरुन हा माल विक्रीस ठेवतात. मागच्या दाराने होत असलेले असे हे व्यवहार पोलिसांच्या निदर्शनास येत नसावेत, असे आपण म्हटले तरी राजरोसपणे याची विक्री कशी होते, हेही न उलगडणारे कोडे आहे. 500 रुपयांमध्ये या चायनीज मांजाची रिल मिळते. त्यामुळे व्यापारी जास्त फायद्याच्या अमिषाने याची विक्री करीत असतात. हल्ली ऍमेझॉन, फ्लिपकार्ट या ऑनलाईन विक्री संकेतस्थळांवरही या मांजाची विक्री होत असल्याने अनेकजण ऑनलाईन पद्धतीने हा मांजा खरेदी करीत असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे चायनीज मांजा विक्रेत्यांपेक्षा चायनीज मांजाचा वापर करुन पतंग उडविणार्‍यांचे अधिक प्रबोधन होणे गरजेचे आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे
पुढील बातमी
आता वीज बील किराणा दुकानातही भरता येणार

संबंधित बातम्या