सातारा: सातारा तालुक्यातील सोनगाव परिसरात १ एप्रिल रोजी सकाळी पावणे दहा वाजण्याच्या सुमारास एक भीषण अपघात घडला. या अपघातात अनिल मारुती शिंदे (वय ५२, रा. सोनगाव, ता. सातारा) या दुचाकीस्वाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, अनिल शिंदे हे त्यांच्या मोटारसायकलवरून (क्रमांक एमएच ११ एजे २२५६) सोनगाव येथील कृष्णा नदीच्या पुलावरून जात होते. यावेळी समोरून येणाऱ्या एका भरधाव कारने (क्रमांक एमएच ०३ ईएल ८४६८) त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. कार चालकाने आपले वाहन निष्काळजीपणे चालवल्याने हा अपघात घडल्याचे सांगण्यात येत आहे. या धडकेत शिंदे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती.
अपघातानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. याप्रकरणी मृताचे चुलत भाऊ अभिजित अंकुश शिंदे (वय ३४, रा. सोनगाव निंब) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कार चालक दयानंद यल्लापा मोरे (रा. कळंबोली, जि. रायगड) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक बिले या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.