निवकणे पंप स्टोरेज प्रकल्पाविरोधात कृती समिती आक्रमक; निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांना निवेदन

by Team Satara Today | published on : 25 February 2026


सातारा : पाटण तालुक्यातील प्रस्तावित निवकणे (एकात्मिक) उदंचन जलविद्युत (पंप स्टोरेज) प्रकल्प (२७०० मेगावॅट) विरोधात केरा विभागातील कृती समितीने आक्रमक भूमिका घेतली आहे. दिनांक २३ फेब्रुवारी २०२६ रोजी सातारा येथे निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांना निवेदन देऊन १८ फेब्रुवारी २०२६ रोजी जवरातवाडी येथे झालेली जनसुनावणी बेकायदेशीर ठरवून ती रद्द करून नव्याने सुनावणी घेण्याची मागणी करण्यात आली.

समितीच्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, प्रकल्पाचे हस्तांतरण पूर्ण झालेले नसताना सुनावणी घेण्यात आली. तसेच महाराष्ट्र पुनर्वसन अधिनियम १९९९ नुसार प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन न करता पुढील प्रक्रिया राबवली जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. “आधी पुनर्वसन मग धरण” हे शासन धोरण डावलले जात असल्याचे समितीचे म्हणणे आहे.

प्रकल्पामुळे सुमारे ३६१.८२ हेक्टर शेती व जंगल क्षेत्र बाधित होणार असून मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. संबंधित क्षेत्र हे Western Ghats मधील इको-सेन्सिटिव्ह झोनमध्ये येत असून प्रकल्पस्थळ Koyna Wildlife Sanctuary च्या सुमारे १५० मीटर अंतरावर असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे जैवविविधता, वन्यजीव आणि पर्यावरणाला गंभीर धोका निर्माण होईल, अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे.

तसेच बोगदे खोदल्यामुळे भूजल पातळी घसरणे, नैसर्गिक झरे आटणे, दरडी कोसळण्याचा धोका वाढणे यांसारख्या परिणामांची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पिण्याच्या पाण्यास व शेतीला प्राधान्य देण्याचे धोरण असताना उद्योगांना प्राधान्य दिले जाणार का, असा सवाल समितीने उपस्थित केला आहे.

नवीन महाबळेश्वर (SPA-MSRDC बेलापूर) योजनेत काही गावे समाविष्ट असल्याने संबंधित विभागाचे मत स्पष्ट करावे, पर्यावरणीय कागदपत्रे मराठीत उपलब्ध करून द्यावीत, तसेच सर्व संबंधित विभाग व कंपनी अधिकाऱ्यांसोबत संयुक्त बैठक घेऊन नव्याने पारदर्शक जनसुनावणी घ्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

हे निवेदन कृती समितीच्या वतीने खालील पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत देण्यात आले. चैतन्य दळवी, दत्तात्रय कदम , सुनिल  शिंदे, नंदकुमार सुर्वे, नंदकुमार जगताप, भरत  शिंदे, सिताराम शिंदे, जगन्नाथ शेळके  आणि अर्जुन  सपकाळ, धीरज पाटणकर विशाल निकम, सुरज पाटणकर, सावंत aaयादी उपस्थित होते 



चौकट - पाटण तालुक्यातील निवकणे एकात्मिक उदंचन जलविद्युत प्रकल्प बाबत जी सुनावणी झाली आहे त्या सुनावणीबाबत व संपूर्ण केरा भाग या प्रकल्पामुळे दुष्काळाच्या झळा सोसाव्या लागणार आहेत त्यामुळे केरा भागातील जनतेने या लढ्या मध्ये भाग घेऊन आपला परिसर वाचवूया या साठी प्रयत्न करणे गरजेचे आहे 

सुरज पाटणकर 

निवकणे


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
साताऱ्यात माजी सैनिकांच्या हत्येच्या निषेधार्थ मोर्चा; हल्लेखोरांना कठोर फाशीची शिक्षा देण्याची मागणी
पुढील बातमी
अण्णासाहेब कल्याणी विद्यालयाला A+ श्रेणी; जिल्ह्याच्या शैक्षणिक गुणवत्तेत मानाचा तुरा रोवला, गुणवत्ता मुल्यांकनात अव्वल क्रमांक

संबंधित बातम्या