मुंबई : देशातील वैद्यकीय पदव्युत्तर (पोस्ट ग्रॅज्युएट) अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेत यंदा महत्त्वाचा बदल घडत असून, राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने (एनएमसी) देशभरात 4 हजार 140 नव्या जागांना मान्यता दिली आहे. यामुळे महाराष्ट्रात 181 नव्या जागांची भर पडली आहे. या जागांचा समावेश प्रवेश प्रक्रियेच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या फेरीत संधी मिळणार आहे.
एनएमसीने दिलेल्या मान्यतेनुसार, देशातील पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या एकूण जागांची संख्या आता 7 हजार 424 झाली आहे. म्हणजेच पदव्युत्तर जागांमध्ये तब्बल 55 टक्क्यांची वाढ झाली आहे. या नव्या जागांना संबंधित राज्ये व वैद्यकीय महाविद्यालयांची अंतिम मान्यता मिळण्याची प्रक्रिया सध्या सुरू असून, ती लवकरच पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या जागांचा समावेश प्रवेश प्रक्रियेच्या पुढील फेऱ्यांमध्ये केला जाऊ शकतो.
सध्या पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमांची पहिली प्रवेश फेरी नुकतीच पूर्ण झाली असून, येत्या काही दिवसांत दुसऱ्या फेरीची प्रक्रिया सुरू होणार आहे. प्रत्येक वैद्यकीय महाविद्यालयात पदव्युत्तर जागांची संख्या मर्यादित असल्याने प्रवेशासाठी नेहमीच तीव्र स्पर्धा पाहायला मिळते. अनेक गुणवंत विद्यार्थ्यांना जागा कमी असल्याने पदव्युत्तर शिक्षणापासून वंचित राहावे लागते. मात्र यंदा नव्याने मंजूर झालेल्या जागांमुळे ही अडचण मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. याचा थेट लाभ पदव्युत्तर शिक्षणाची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना होणार असून, यंदा मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांना एमडीएमएस अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. राज्यनिहाय पाहता, कर्नाटकात सर्वाधिक 717 जागा वाढल्या आहेत. त्यापाठोपाठ उत्तर प्रदेशमध्ये 618, तामिळनाडूमध्ये 418, मध्य प्रदेशमध्ये 368, तेलंगणामध्ये 353, आंध्र प्रदेशमध्ये 316, राजस्थानमध्ये 271, गुजरातमध्ये 233, पश्चिम बंगालमध्ये 181, हरयाणामध्ये 117, बिहारमध्ये 83, छत्तीसगडमध्ये 74, उत्तराखंडमध्ये 70, पंजाबमध्ये 57, केरळमध्ये 53, ओडिशामध्ये 47, त्रिपुरामध्ये 10 आणि पुद्दुचेरीमध्ये 7 जागा वाढल्या आहेत.