सातारा : वरुड येथील सरोवराचे विहंगम दृष्य पाहिल्यावर कास पठाराची अनुभूती येत आहे. वरुडकरांनी अथक परिश्रमाने इतर गावांना आदर्श ठरावे असे काम केले आहे. आता मी शब्द दिल्याप्रमाणे औंधसह २१ गावांची पाणी योजना अडीच वर्षात पूर्ण करुन वरुडच्या महत्वाकांक्षी जलाशयाला कधीच पाणी कमी पडून देणार नाही, असा विश्वास ग्रामविकास मंत्री ना. जयकुमार गोरे यांनी व्यक्त केला.
'से ट्रीज' संस्थेच्या सहकार्याने वरूड येथील तलावाचे रूपांतर विहंगम जलाशयात करण्यात आले आहे. या जलाशयामुळे जलसंधारणाच्या कामात मोठी मदत झाली आहे. हे ठिकाण खटाव तालुक्यातील एक महत्त्वपूर्ण पर्यटन स्थळ म्हणून विकसित करण्याचे ग्रामविकास मंत्री ना. जयकुमार गोरे यांनी ठरवले आहे. वरुड जलाशय परिसराला पर्यटनस्थळाचा ब वर्ग दर्जा देऊन पाच कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा त्यांनी जलाशय लोकार्पण सोहळ्याच्या कार्यक्रमात केली.
ना. गोरे म्हणाले, कास पठाराच्या एका बाजूला उरमोडी धरण दिसते. त्याच उरमोडी योजनेचे पाणी गेल्या १२ वर्षांपासून माण-खटावला येत आहे. जिहेकठापूर योजनेचेही पाणी आपल्या मतदारसंघात येत आहे. टेंभू योजनेला वाढीव पाणी मिळवून त्या योजनेची कामे वेगाने सुरु आहेत. औंधसह २१ गावांच्या पाणी योजनेला सर्व मंजुरी आणि मान्यता मिळाल्या आहेत. आता टेंडर प्रक्रियेलाही लवकरच मान्यता मिळणार आहे. मी शब्द दिल्याप्रमाणे औंध पाणी योजना अडीच वर्षात पूर्ण करणार आहे. या योजनेचे पाणी आल्यावर वरुड जलाशय कायम भरलेला असणार आहे.
ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी वरुड तलावाचे रूपांतर विहंगम सरोवरमध्ये करण्यासाठी विशेष प्रयत्न करणारे 'से ट्रीज' संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ले. कमांडर पयासी, चैतन्य जोशी, आबा लाड, ऋषिकेश माने, मोहन माळी, जितेंद्र शिंदे यांच्यासह संपूर्ण वरूड गावातील मान्यवरांचा सन्मान केला.
कार्यक्रमाला माजी आ. दिलीपराव येळगावकर, उद्योजक अंकुश गोरे, 'से ट्रीज' संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ले. कमांडर पयासी, प्रा. बंडा गोडसे, वसुंधरा अभियानाचे माजी मिशन डायरेक्टर सुधाकर बोबडे, सावता माळी, धनंजय चव्हाण, नंदकुमार मोरे, तहसीलदार बाई माने, सोमनाथ भोसले, विशाल बागल, रामभाऊ पाटील, डॉ. विवेक देशमुख, भरतशेठ जाधव, संजयशेठ शितोळे, नंदकुमार जोशी, शशिकांत मोरे, संदीप मांडवे, खटाव गटविकास अधिकारी योगेश कदम, सरपंच शहाजी देशमुख, हरिदास बनसोडे, उपसरपंच सदाशिव माने, सतीश माने, वसंत माने, अरुण इनामदार, सुषमा माळी ,राघोबा भुजबळ ,सुरेश साळुंखे, मोहन शास्त्री इनामदार, वैशाली माने,आप्पासाहेब फडतरे, शशिकांत जाधव, लालासाहेब माने, दीपक शेठ जगदाळे, दत्तात्रय काटकर ,विष्णुपंत वाघमारे ,सचिन माने, दादासाहेब सूर्यवंशी, गोरख चव्हाण, दीपक माने उपस्थित होते.