कोरेगाव : शहरातील रस्त्यांचा बोजवारा, वाहतूक कोंडी, आणि प्रशासनाचा निष्क्रिय कारभार या सर्वांच्या मुळाशी मेगा इंजिनिअरिंग कंपनीची बेपर्वा कामगिरी आणि राजकीय पाठबळ असल्याचा स्फोटक आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांनी केला. “भाजपशी निगडित असलेल्या या कंपनीने कोरेगावचा विकास खुंटवला आहे, आणि कोणीच त्यांना हात घालण्याची हिंमत दाखवत नाही,” असा थेट घणाघात त्यांनी केला.
शनिवारी सकाळी ल्हासुर्णे येथील आपल्या निवासस्थानी शनिवारी सकाळी दहा वाजता पत्रकारांशी बोलताना आमदार शिंदे यांनी संतापाचा सुर लावला. कोरेगाव शहरात आज ज्या प्रमाणात वाहतूक कोंडी वाढली आहे, त्याला मेगा इंजिनिअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड ही कंपनी थेट जबाबदार आहे. या कंपनीकडे रस्त्याचे काम आहे, पण प्रगती शून्य. केवळ कागदोपत्री काम दाखवून कोट्यवधी रुपये खर्च दाखवले जात आहेत, असा गंभीर आरोप त्यांनी केला.
कोरेगावकरांचा संयम आता संपत चालला आहे. लोक दररोज तासनतास वाहतूक कोंडीमध्ये अडकतात, अपघात वाढले आहेत, व्यापाऱ्यांचे नुकसान होते आहे, पण मेगा इंजिनिअरिंगच्या ढिसाळ कामाबाबत प्रशासन गप्प आहे. कारण ही कंपनी सत्ताधारी भाजपशी थेट जोडलेली आहे.
आम्ही पूर्वी वाहतूक नियोजन करून शहराला दिलासा देण्याचा प्रयत्न केला होता. पर्यायी रस्ते आखले होते. पण मध्यंतरीच्या काळात सत्ताधाऱ्यांनी हे सर्व धाब्यावर बसवले. नगरपंचायतीने तर कोट्यवधींची टेंडर काढून गोंधळ माजवला. त्या रकमेकडे पाहूनच रस्ते विकास महामंडळ चकित झाले, अशी टोलेबाजी त्यांनी केली.
मेगा इंजिनिअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड या कंपनीला राजकीय आश्रय मिळाल्यामुळेच त्यांच्यावर कारवाई होत नाही. दिल्लीपर्यंत त्यांची पोहोच असल्याने स्थानिक प्रशासन फक्त तमाशा बघत आहे. पण आता जनता मूक राहणार नाही. जर या कंपनीचे काम तात्काळ काढून घेतले नाही, तर आम्ही मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर उतरणार आणि जनआंदोलन उभे करणार आहे, असा इशारा त्यांनी दिला.
कोरेगाव शहरात वाढणारी कोंडी, उध्वस्त रस्ते आणि मेगा इंजिनिअरिंगची निष्क्रियता, हे चित्र आता लोकांच्या सहनशक्तीचा अंत घडवत आहे. विकासाच्या नावाखाली मेगा इंजिनिअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड या कंपनीने कोरेगावच्या आशा गाडल्या, अशीच जनतेत चर्चा रंगत आहे.